हे चार गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाला देणार नेटमध्ये सराव…

सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

या 15 जणांच्या भारतीय संघात मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या हा देखील वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहे.

याचमुळे वेगवान गोलंदाजीसाठी चारच भक्कम पर्याय भारताकडे विश्वचषकासाठी असल्याने बीसीसीआयने खलील अहमद, आवेश खान, दिपक चहर आणि नवदीप सैनी यांनाही भारतीय संघाबरोबर विश्वचषकासाठी इंग्लंडला पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे गोलंदाज भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी करण्यात मदत करतील.

याबद्दल 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या संघाची निवड करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने म्हटले आहे की ‘हे चार खेळाडू भारतीय संघाला विश्वचषकाच्या तयारीत मदत करतील.’

हे चारही गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. खलीलने 2018 च्या आशिया चषकात हाँगकाँग विरुद्ध पदार्पण केले होते. तो 8 वनडे सामने खेळला असून त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

सैनीला अजून भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला मागीलवर्षी अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतू त्याला अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळाली नव्हती.

त्याचबरोबर दीपक चहरने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने या आयपीएल मोसमात आत्तापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आवेश खान हा चेंडूला चांगला वेग देऊ शकतो. त्यामुळे त्याची भारताला विश्वचषकासाठी सराव करण्यात मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग

…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश