खेलो इंडिया: स्पोटर्स एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात

पुणे। फुटबॉल, रायफल शुटींग सारख्या खेळांसोबतच कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळामध्ये स्वत: मैदानात उतरुन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने आयोजित केलेल्या स्पोर्टस् एक्स्पोमधील विविध खेळांमध्ये स्वत: सहभागी होत खेलेगा महाराष्ट्र जितेगा राष्ट्र असा संदेश दिला.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये हा एक्स्पो भरविण्यात आला आहे. एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे राजेश पांडे, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, आशिष पेंडसे, खेलो इंडियाचे माध्यम समन्वयक रवींद्र नाईक यांसह क्रीडा अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पोटर्स एक्स्पोमध्ये ६० विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. खेळाडूंचे करियर, विकास आणि तंत्रज्ञानाविषयी यामध्ये माहिती देण्यात येत आहे. याशिवाय खेळाडूंना आहारविषयक फिटनेस संबंधी सेमिनार देखील आयोजित करण्यात आली आहेत. आहारविषयक माहिती देणारे आहारतज्ज्ञ यामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ऑलिम्पिकविषयी माहिती देणारे प्रदर्शनही आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा, याकरीता धर्नुविद्या, लगोरी, रिले, वॉल क्लायम्बिंग, गोटया, फुटबॉल यांसारखे खेळ आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक २० जानेवारीपर्यंत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना पाहण्याकरीता खुले राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

देशातील १ हजार खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार – केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड

खेलो इंडिया युथ गेम्स: ज्युदोत महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा