खेलो इंडिया: खो खोमध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, कबड्डी, बास्केटबॉल, टेनिसमध्ये आगेकूच

पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो खो मध्ये वर्चस्व गाजविले. खो खो १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली याच्या चारही गटात महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. याशिवाय कबड्डी, बास्केटबॉल, टेनिस, मुष्टीयुद्ध, टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आगेकूच केली आहे.

खो खो :-

महाराष्ट्राने १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली या चारही गटांत अंतिम फेरी गाठली.

महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुलांच्या उपांत्य फेरीत गुजरातचा १३-९ असा एक डाव चार गुणांनी पराभव केला. त्याचे श्रेय प्रतिक बांगर (अडीच मिनिटे), आयुष गुरव (तीन गडी), ओंकार हंचाटे (अडीच मिनिटे व एक गडी) यांच्या उल्लेखनीय कामगिरीस द्यावे लागेल.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ओडिशा संघाचे आव्हान १०-७ असे एक डाव तीन गुणांनी परतविले. त्यामध्ये प्रियंका भोपी हिने नाबाद ३ मि. २० सेकंद व नाबाद दीड मिनिटे असा पळतीचा खेळ केला. अपेक्षा सुतार (तीन मिनिटे), काजल भोर (२ मि. २० सेकंद व तीन गडी), कविता घाणेकर (२ मि. २० सेकंद) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला.

मुलांच्या १७ वर्षाखालील उपांत्य लढतीत महाराष्ट्राने तामिळनाडूचा १२-६ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. त्या वेळी त्यांनी पूर्वार्धात १२-२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राकडून रोहन कोरे (साडेतीन मिनिटे व एक गडी), विजय शिंदे (२ मि.२० सेकंद व २ गडी), दिलीप खांडवी (नाबाद २ मि.४० सेकंद), चंदू चावरे (२ मि. व ३ गडी), विशाल दुकले (२ मि.४० सेकंद व ३ गडी) यांनी चमकदार खेळ केला.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने अंतिम फेरीत स्थान मिळविताना पंजाबचे आव्हान ७-६ असा पाच मिनिटे राखून पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी ५-३ अशी आघाडी मिळविली होती. महाराष्ट्राकडून श्रुती शिंदे हिने दोन्ही डावात प्रत्येकी तीन मिनिटे पळतीचा खेळ केला. अश्विानी मोरे (२ मि.२० सेकंद व ३ मि.२० सेकंद), हर्षदा पाटील (२ गडी) यांनीही संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

खो खो चे अंतिम सामने गुरुवारी सायंकाळच्या सत्रात होणार आहेत.

बास्केटबॉल :-

महाराष्ट्राला बास्केटबॉलमध्ये संमिश्र यशास सामोरे जावे लागले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. त्यांनी कर्नाटकला रंगतदार लढतीत ८०-७४ असे पराभूत केले. पूर्वार्धात त्यांनी ४१-३६ अशी आघाडी घेतली होती. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा दुरावल्या आहेत. बलाढ्य पंजाबच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राचा बचाव निष्फळ ठरला, त्यामुळेच त्यांना ४८-७२ असा पराभव पत्करावा लागला. पूर्वार्धात पंजाबने ३८-२० अशी आघाडी घेतली होती. पंजाबकडून अरविंदरसिंग व राजिंदरसिंंग हे चमकले. महाराष्ट्राकडून प्रीतिश कोकाटे व रझा शेख यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

व्हॉलिबॉल

महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुलांच्या विभागात पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना आंध्रप्रदेश संघाने २६-२४, २५-१४, २५-२० असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या खेळांडूंनी आंध्रप्रदेश संघाला कौतुकास्पद लढत दिली. तथापि आक्रमक स्मॅशिंग करीत आंध्रप्रदेशने हा सामना जिंकला. त्याचे श्रेय पवन कल्याण व साईराम यांच्या अष्टपैलू खेळास द्याावे लागेल. महाराष्ट्राच्या केशव गायकवाड व व्ही.आदित्य यांनी चांगली झुंज दिली. याच वयोगटातील अन्य सामन्यात तामिळनाडू संघाने हरयाणाचा २५-२३, २५-२७, २५-१२, २५-१८ असा पराभव केला.

मुष्टीयुद्ध

महाराष्ट्राच्या मितिका गुणेले हिने १७ वर्षाखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित केले. तिने ६६ किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाच्या अन्नू राणी हिचा ५-० असा सहज पराभव केला. पहिल्या फेरीपासून मितिका हिने या लढतीवर नियंत्रण मिळविले होते. तिने तीनही फेºयांमध्ये आक्रमक ठोसेबाजी करीत अन्नू हिला फारशी संधी दिली नाही.

महाराष्ट्राच्या आकाश गोरखा याने मुलांच्या गटात आव्हान राखले. त्याने १७ वर्षाखालील ५७ किलो वजनी विभागात आपलाच सहकारी थांगजामचा याच्यावर ३-२ अशी मात केली. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या रोहन पंडेरे याला मात्र उत्तरप्रदेशच्या राहुल मेमेगे याने ३-२ असे हरविले. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या लैश्राम सिंग याने पदकाच्या दिशेने वाटचाल राखताना आसामच्या इमदाद हुसेन याचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणले. आकाशकुमार या महाराष्ट्राच्या खेळाडूला ६६ किलो विभागात उत्तराखंडच्या पंकजकुमार याने ३-२ असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या अमनदीपसिंग याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला हरयाणाच्या सुमीतकुमार याने ५-० असे निष्प्रभ केले.

कबड्डी :-

महाराष्ट्राच्या खेळाडूंची अन्य गटात पराभव सुरू असतानाच २१ वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी साख ळी गटातील शेवटच्या लढतीत उत्तरप्रदेशचा ३८-२३ असा पराभव केला. पूर्वार्धात २०-१४ अशी महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. ही आघाडीच महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरली. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी व आसावरी खोचरे यांनी केलेल्या खोलवर चढायांपुढे उत्तरप्रदेशचा बचाव निष्प्रभ ठरला.

उत्तरप्रदेशकडून अमरीशकुमारी व शिवानी यांनी चढायांमध्ये काही गुण मिळविले मात्र महाराष्ट्राची आघाडी तोडणे त्यांना शक्य झाले नाही. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हिमाचल प्रदेशच्या आव्हानास तोंड द्याावे लागणार आहे. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत हरयाणापुढे आंध्रप्रदेशचे आव्हान असणार आहे.

मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडू संघावर ४०-३९ अशी मात केली. तथापी, उपांत्य फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

टेनिस :-

आर्यन भाटिया व मिहिका यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपराजित्व राखून टेनिसमधील अनुक्रमे १७ वर्षाखालील मुले व २१ वर्षाखालील मुलींमध्ये अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्याच गार्गी पवार, प्रेरणा विचारे यांनीही अपराजित्व राखताना टेनिसमधील वाटचाल कायम राखली.

खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेतील मुलांच्या १७ वर्षाखालील गटात आर्यन याने अग्रमानांकित सुशांत दबस या हरयाणाच्या खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविला. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत ७-५, ३-६, ६-२ अशी विजयश्री संपादन केली. या विजयासह त्याने अंतिम फेरी निश्चित केली. मुलींच्या २१ वर्षाखालील एकेरीत मिहिका हिने उपांत्य फेरीत उत्तरप्रदेशच्या काव्या सवानी हिच्यावर ६-३, ६-३ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात गार्गी हिने हरयाणाच्या अंजली राठी हिच्यावर ६-२, ६-७ (४-७), ६-३ अशी मात केली. चुरशीने झालेल्या या लढतीत दुसरा सेट गमावल्यानंतरही गार्गी हिने सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवित तिसरा सेट घेतला आणि सामना जिंकला. याच वयोगटात प्रेरणा हिने तामिळनाडूच्या एस.पांडिथिरा हिला ४-६, ६-३, ७-६ (७-५) असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर कोणतेही दडपण न घेता प्रेरणा हिने उर्वरित दोन्ही सेट्स घेतले.

टेबल टेनिस :-

महाराष्ट्राच्या दिया चितळे, सृष्टी हेळंगडी व देव श्रॉफ यांनी पात्रता फेरीत विजय मिळवित टेबल टेनिसमध्ये आव्हान राखले.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात दिया हिने कर्नाटकच्या आदिती जोशी हिचा ११-९, ११-६, १४-१२ असा पराभव केला. या गटात तेजल कांबळे हिला अनुषा कुटुंबळे या मध्यप्रदेशच्या खेळाडूने ११-८, १४-१२, ११-९ असे हरविले. समृद्धी कुलकर्णी हिला राधाप्रिया गोयल (उत्तरप्रदेश) हिच्याकडून ६-११, १२-१०, २-११, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात सृष्टी हिने तेलंगणाच्या अकुला श्रिजा हिच्यावर ११-८, ११-९, ११-७ अशी सरळ तीन गेम्समध्ये मात केली.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात दीपित पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूने दिल्लीच्या आरुष दत्त याचा ११-६, ११-८, ३-११, ११-९ असा पराभव केला. देव श्रॉफ याने अंदमान व निकोबारच्या सॅम्युअल अडवानी याच्यावर ११-५, ११-६, ११-३ असा दणदणीत विजय नोंदविला.