खेलो इंडियाच्या क्रीडानगरीतील व्यवस्थांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

पुणे। खेलो इंडिया २०१९ क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीस भेट दिली. यावेळी खेलो इंडियाची संयोजन समिती, क्रीडा अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व व्यवस्थांचा आढावा घेत तयारीबाबत संपूर्ण माहिती घेतली.

यावेळी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राज्याच्या क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव आणि खेलो इंडिया संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, क्रीडा खात्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर, राज्याच्या क्रीडामंत्र्यांचे स्वीयसचिव श्रीपाद ढेकणे आदी यावेळी उपस्थित होते.

क्रीडानगरीतील बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस, ज्युदो, कुस्ती संकुल यांसह विविध स्टेडियम्स, नेमबाजी केंद्र, खेळाडू व पदाधिका-यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थांच्या तयारीबाबत तसेच तेथील सुविधा, सोयींबाबत त्यांनी आढावा घेतला. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बॅडमिंटन सभागृहात होणार असून तेथील आसन व्यवस्था, उद्घाटन सोहळ्याची इतर तयारी याबाबत त्यांनी माहिती करुन घेतली.

सुनील केंद्रेकर आणि नरेंद्र सोपल यांनी सर्व व्यवस्थेबाबतची माहिती लिमये यांना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रशासनाने सर्व सहकार्य करुन स्पर्धेच्या यशस्वी नियोजनाच्या दृष्टीने काम करुया, असा विश्वास लिमये यांनी यावेळी व्यक्त केला.