खेलो इंडिया युथ गेम्सच्या अ‍ॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

पुण्यात ९ ते २० जानेवारी दरम्यान स्पर्धा ; टीव्हीसी (चित्रफित) व जिंगलचे उद्घाटन

पुणे । केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे मंत्रालयात खेलो इंडिया अ‍ॅप, स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टीव्हीसी (चित्रफीत) आणि जिंगलचे अनावरण करण्यात आले. दिनांक ९ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे १८ क्रीडाप्रकारात ही स्पर्धा होणार आहेत.

अनावरणप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राजेंद्र पटनी, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव राजेंद्र पवार, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, मुंबई विभागाचे उपसंचालक नागा मोटे, क्रीडा मंत्र्यांचे स्वीय सचिव श्रीपाद ढेकणे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी खेलो इंडियाच्या महाराष्ट्र संघास शुभेच्छा दिल्या.

गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. खेलो इंडिया स्पर्धा दिनांक ९ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे होणार आहेत. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल अशा खेळांमध्ये विविध खेळाडू सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत १७ व २१ वषार्खालील मुले व मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ/खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू असे सुमारे १२ हजार ५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

खेलो इंडिया मोबाईल अ‍ॅप –
खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये सहभागी होणा-या खेळाडूंना, प्रेक्षकांना या स्पर्धेबाबत घरबसल्या आपल्या हातातील मोबाईलमध्ये पूर्ण माहिती मिळावी, यासाठी हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.या अ‍ॅपमध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची पूर्ण माहिती असून खेळाचे संपूर्ण वेळापत्रक आहे. तसेच महत्वाचे संपर्क, वाहतूक व्यवस्था याबाबतची माहिती यामध्ये उपलब्ध असून पुणे शहर आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपवर स्पर्धेची पदतालिका दररोज उपलब्ध होणार आहे.