महाराष्ट्राला आज जिम्नॉस्टिक्समध्ये आणखी पदकांची आशा

पुणे । महाराष्ट्राच्या मुलांनी व मुलींनी विविध प्रकारात अंतिम फेरीतील स्थान निश्चित करीत संघास आणखी पदकांच्या आशा निर्माण केल्या आहेत. या अंतिम फेरी गुरुवारी (दि.९) होणार आहेत. मुलींच्या कलात्मक अ‍ॅपेरेटस प्रकारात महाराष्ट्राच्या सोहम नाईक, पूर्वा किरवे यांंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत त्यांनी अनुक्रमे दुसरे व चौथे स्थान घेतले आहे. त्यांच्यापुढे पश्चिम बंगालच्या खेळाडूंचे प्रामुख्याने आव्हान आहे.

व्हॉल्टमध्ये महाराष्ट्राच्या गरिश्मा शर्मा व सोहम नाईक यांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान घेतले आहे. या प्रकारातही पश्चिम बंगालच्या खेळाडूंबरोबर त्यांना पदकासाठी लढत द्याावी लागणार आहे. मंगळवारी महाराष्ट्राला पदकांची कमाई करुन देणाºया रिद्धी व सिद्धी हत्तेकर यांंनी अ‍ॅपेरेटस व असमांतर बार या वैयक्तिक विभागातही अंतिम फेरी गाठली आहे. अ‍ॅपेरेटसमध्ये रिद्धी हिने पात्रता फेरीत अव्वल क्रमांक घेतला असून तिने सुवर्णपदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत. पूर्वा किरवे हिनेदेखील याच प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिद्धी हिने असमांतर बार प्रकारात प्रथम क्रमांकाने अंतिम फेरी गाठली आहे. या प्रकारात तिची सहकारी मयूरी आरे हिने द्वितीय क्रमांकाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलांमध्ये श्रेयस मंडलिक व महेश गाढवे यांनी अ‍ॅपेरेटस प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान घेतले आहे. याच दोन खेळाडूंनी पॉमेल हॉर्स प्रकारातही अंतिम फेरी गाठली व पदकाच्या संधी निर्माण केल्या आहेत. पात्रता फेरीत श्रेयस हा अव्वल स्थानावर असून महेश पाचव्या स्थानावर होता. रिंग्ज प्रकारात त्यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान घेत अंतिम फेरी गाठली. महेशने व्हॉल्टमध्ये सातव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली आहे.याच दोन खेळाडूंनी हाय बार प्रकारातही पदकाच्या फेरीत स्थान घेत अपराजित्व राखले आहे. त्याच्यापाठोपाठ चैतन्य देशमुख याने स्थान घेत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंना सर्वच प्रकारात दिल्ली व उत्तरप्रदेशच्या खेळाडूंचे आव्हान आहे.