खेलो इंडिया: जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार

पुणे। महाराष्ट्राच्या खेळांडूंनी जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकर हिने दोन प्रकारात तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवित महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक ब्राँझपदकाची कमाई केली.

मुलींच्या २१ वषार्खालील क्लब्ज प्रकारात रिचा हिने ११.६५ गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी आदिती दांडेकर हिने १०.७५ गुणांसह रौप्यपदक मिळविले तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौर हिने १० गुणांसह ब्राँझपदकाची कमाई केली. आदिती हिने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना १२.१५ गुणांची नोंद केली.

तेलंगणाच्या जी.मेघना रेड्डी हिने १०.५० गुणांसह रौप्यपदक पटकाविले. मेहकप्रीत हिला या प्रकारातही ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. आदिती हिने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने १२.६५ गुण नोंदविले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले. आदिती हिला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने १०.४५ गुण मिळविले. मेघना रेड्डी हिने ११.०५ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले.

हॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिक याने सुवर्णपदक जिंकताना १२.२५ गुण नोंदविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याने रौप्यपदक मिळविताना ११.४० गुणांची कमाई केली. दिल्लीच्या इसाक अन्वर याने ११.१५ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले. समांतर बार प्रकारात अरिक याला रौप्यपदक मिळाले. त्याने १२.३० गुण मिळविले. अग्निवेश पांडे (उत्तरप्रदेश) याने १२.४५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पंजाबच्या आर्यन शर्मा याने ११.२५ गुणांसह ब्राँझपदक मिळविले.