खेलो इंडिया: वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या रुपा हनगंडीचा सुवर्णवेध

पुणे। महाराष्ट्रातील सांगलीची रुपा हनगंडी हिने २१ वर्षाखालील महिलांच्या ५९ किलो गटात सोनेरी वेध घेतला. तिने स्नॅचमध्ये ८३ किलो वजन उचलताना पश्चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदविलेला ८१ किलो हा विक्रम मोडला. तिने क्लीन व जर्कमध्ये १०३ किलो असे एकूण १८६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.

हरयाणाच्या मोहिनी चव्हाण हिने अनुक्रमे ८२ किलो व ९९ किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली. आदक हिला येथे ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचमध्ये ८१ किलो तसेच क्लीन व जर्कमध्ये ९६ किलो असे एकूण १७७ किलो वजन उचलले. १७ वषार्खालील मुलींच्या ५९ किलो गटात आसामच्या दितिमोनी सोनोवाल हिला सुवर्णपदक मिळाले. स्नॅचमध्ये ६७ किलो तसेच क्लीन व जर्कमध्ये ८४ किलो असे एकूण १५१ किलो वजन उचलले. तामिळनाडूची वाय. पूर्णाश्री हिने १४६ किलो वजन उचलीत रौप्यपदक मिळविले तर तेलंगणाच्या व्ही.साहिथी हिला ब्राँझपदक मिळाले.

जलतरणाच्या रिलेत महाराष्ट्राला विजेतेपद

महाराष्ट्राच्या रिले संघाने अपेक्षेप्रमाणे २१ वषार्खालील महिलांच्या चार बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. युगा बिरनाळे, ऋतजा तळेगावकर, युक्ता वखारिया व साध्वी धुरी यांच्या संघाने हे अंतर चार मिनिटे १४.२१ सेकंदात पार केले. तामिळनाडू व पश्चिम बंगाल यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले. १७ वषार्खालील मुलींच्या चार बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. त्यांनी हे अंतर चार मिनिटे ११.१९ सेकंदात पार केले. दिल्ली संघाने हे अंतर चार मिनिटे ९.३६ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.