खेलो इंडिया: अडथळ्याच्या शर्यतीत महाराष्ट्राची चार पदकांची कमाई

पुणे। महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदकाची जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात रौप्यपदक पटकाविले. तसेच १०० मीटर मुलींच्या गटात प्रांजली पाटील हिने रौप्यपदकाच्या कमाई केली.

अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील गटात अल्डेनने १४.१० सेकंदात अंतर पार करीत केरळचा सी मोहम्मद (१४.११ से.) व महाराष्ट्राचा अभिषेक उभे याला (१४.३२ से.) मागे टाकले. अभिषेकला कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. अल्डेन हा मुंबईत दयानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो अभियांत्रिकी दुस-या वर्षात शिकत आहे. त्याने रांची येथे झालेल्या कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते, त्यावेळी त्याचा राष्ट्रीय विक्रम थोडक्यात हुकला होता.

शेतक-याच्या मुलाचे रुपेरी यश

तेजस शिरसे हा औरंगाबाद जवळील देवगाव रंगारी येथील शेतक-याचा मुलगा आहे. जुलै २०१७ मध्ये त्याने अ‍ॅथलेटिक्सच्या करियरला सुरुवात केली. तो सध्या सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. शाळेत असताना पूनम राठोड यांच्याकडून त्याने अ‍ॅथलेटिक्स बाळकडू घेतले. तो आंबेडकर विद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत आहे.

मुलींमध्ये १७ वर्षाखालील गटात तामिळनाडूच्या थबीथा पी.एम. हिने १४.१४ सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील (१४.४९ से.) हिने रौप्यपदकाची कमाई केली. प्रांजली ही मुंबई येथे विरेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. शाळेत असताना बालासार या क्रीडा शिक्षकांकडूनच तिला अ‍ॅथलेटिक्सची प्रेरणा मिळाली. सध्या ती १० व्या इयत्तेत शिकत असल्यामुळे एकाच वेळी दहावीचा अभ्यास व अ‍ॅथलेटिक्सचा सराव याचा कसाबसा ताळमेळ राखत आहे. गेले दीड महिना विविध स्पर्धांच्या चाचणी व सरावांमुळे तिला खूपच प्रवास करावा लागला होता. त्याचाही परिणाम माझ्या कामगिरीवर झाला, अन्यथा मी सुवर्णपदक घेतले असते, असे तिने सांगितले.

चार बाय १०० मीटर्स रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना दुहेरी मुकुट

चार बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. १७ वर्षाखालील महाराष्ट्राच्या सुदेश्ना शिवणकर, हरिता भद्रा, आदिती परब, अवंतिका नरळे या मुलींनी हे अंतर ४८.३१ सेकंदात पार केले. त्यांच्या पाठोपाठ केरळ (४८.६१ से.) आणि तामिळनाडू (५१.३६ से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कास्यंपदक पटकाविले.

तसेच २१ वर्षाखालील महाराष्ट्राच्या रोझलीन लेव्हीस, सिद्धी हिरे, रश्मी शेरीगर, किर्ती भोईटे या मुलींच्या संघाने ४७.२२ सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदकावर आपले नाव निश्चित केले. शेवटच्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या रश्मी शेरीगर हिने आपला वेग वाढवत केरळच्या खेळाडूंच्या पुढे जात संघाला विजय मिळवून दिला. केरळ ( ४७.२९ से.) संघाने रौप्य आणि तामिळनाडू (४७.८७ से.) संघाने कास्यंपदक पटकाविले.

मुलांमध्ये १७ वर्षाखालील गटात केरळने (४३.२१ से.) सुवर्ण, तामिळनाडू (४४.३७ से.) संघाने रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना (४४.८० से.) कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. तर, २१ वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलांना देखील केरळ (४१.७७ से.), तामिळनाडू (४२.०१ से.) यांनी मागे टाकले. महाराष्ट्राच्य संघाने ४२.७९ से. अंतर पार करीत कास्यंपदक मिळविले.