खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम

पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. शनिवार अखेर एकूण ८२ सुवर्ण, ६० रौप्य आणि ७५ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ २१७ पदकांसह आघाडी कायम राखली.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिस, टेबलटेनिस, मुष्टीयुद्ध खेळामध्ये यश मिळवित पदके मिळविली. रविवारी (दि.२०) स्पर्धेचा समारोप सोहळा दुपारी १२ वाजता होणार असून याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, क्रीडा मंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्र अंतिम फेरीत

सांघिक खेळांमध्ये महाराष्ट्राची निराशाजनक कामगिरी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉलपटूंनी दिलासा दिला. त्यांनी १७ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरी गाठली. त्यांनी उत्कंठापूर्ण लढतीत केरळचा ३-२ अशा सेट्सने पराभव केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राची पश्चिम बंगाल संघाशी गाठ पडणार आहे. २१ वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांना पश्चिम बंगाल संघाने २५-६, २५-२०, २५-१९ असे सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले.

बास्केटबॉल कांस्यपदक मिळविण्यात महाराष्ट्राला अपयश

रोमहर्षक लढतीत शेवटच्या पाच मिनिटांत अचूकतेच्या अभावी महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुलांमध्ये कांस्यपदक मिळविण्यात अपयश आले. १७ वर्षाखालील गटात त्यांना केरळने ७९-६८ असे हरविले. २१ वर्षाखालील मुलांमध्ये त्यांना केरळ संघानेच ७९-७३ असे पराभूत केले.

तिरंदाजी

महाराष्ट्राला सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात कास्यंपदक मिळवून दिले. कास्यंपदकाच्या प्ले ऑफ लढतीत त्याने राजस्थानच्या जगदीश चौधरी याचा ६-२ असा सहज पराभव केला.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या तीन तिरंदाजांनी सुवर्णपदकाची संधी आहे. यामध्ये कम्पाउंड प्रकारात १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रथमेश जावकर, मुलींच्या गटात ईशा पवार, तर २१ वर्षांखालील गटात रिकर्व्ह प्रकारात साक्षी शितोळे यांनी अंतिम फेरी गाठली आहे.

मुष्टीयुद्ध

महाराष्ट्राने चार सुवर्ण, एक रौप्यपदक व नऊ कांस्यपदके मिळवित मुष्टीयुद्धात कौतुकास्पद कामगिरी केली. निखिल दुबे, बरुणसिंग, भावेशकुमार व हरिवंश तिवारी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या अजय पेंडोर याला रौप्यपदक मिळाले.

महाराष्ट्राचा मुष्टीयोद्धा निखिल दुबे याने २१ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकताना हरयाणाच्या नितीनकुमार याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. नितीनकुमार याने कनिष्ठ गटात आशियाई व जागतिक चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळेच या लढतीत नितीनचे पारडे जड मानले जात होते. तथापि निखिल याने खेळाच्या जोरावरच त्याने ४-१ अशी विजयश्री खेचून आणली.

बरुणसिंग याने २१ वर्षाखालील विभागातील ४९ किलो गटात आपलाच सहकारी अजय पेंडोर याच्यावर शानदार विजय मिळविला. बरुणसिंग याने युवा जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच त्याने सात देशांच्या निमंत्रित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

याच वयोगटातील ५२ किलो गटात भावेश याने कर्नाटकच्या अन्वर याला पराभूत करीत सनसनाटी कामगिरी केली. अन्वर याने जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरिवंश तिवारी याने ६० किलो गटात हरयाणाच्या अंकित याला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. या लढतीत हरिवंश याने कोणतेही दडपण न घेता सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळेच त्याला ४-१ असा विजय मिळविता आला. अंकित याने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.

टेबल टेनिस

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळवित शनिवारी टेबल टेनिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या चिन्मय सोमया याने काल १७ वर्षाखालील एकेरीत अजिंक्यपद मिळविले होते. त्याने आज देव श्रॉफ याच्या साथीत दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मैनिक रॉय व सौम्यदीप सरकार यांचा ११-८, ११-७, ११-४ असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला.

मुलींच्या १७ वर्षाखालील दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या खेळांडूंनी रिशा गोगोई व गार्गी गोस्वामी यांचा ११-४, ११-६, ११-० असा पराभव केला. दिया हिने काल एकेरीत उपविजेतेपद मिळविले होते.

मुलांच्या २१ वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे व रिगान अलबुकर्क यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्यांना गुजरातच्या मानुष शाह व ईशान हिंगोरानी यांनी ९-११, १०-१२, ११-६, ११-५, ११-७ असे पराभूत केले. पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर त्यांनी टॉपस्पीन फटके व प्लेसिंग याचा बहारदार खेळ करीत विजेतेपद खेचून आणले.

टेनिस

महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सेंटर कोर्टवर झालेल्या उत्कंठापूर्ण लढतीत प्रेरणा हिने गुजरातच्या प्रियांशी भंडारी हिचे आव्हान ६-२, ५-७, ७-५ असे परतविले.

मुलांच्या एकेरीत ध्रुव सुनीश याला तामिळनाडूच्या मनीष सुरेशकुमार याने ६-३, ६-३ असे सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले. ध्रुव याला या सामन्यात अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. मनीष याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने भेदक सर्व्हिसही करीत ध्रुव याला फारशी संधी दिली नाही.