खेलो इंडिया: जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला एरिक डेला सुवर्णपदक

पुणे। जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने २१ वर्षाखालील गटातील साधन प्रकारांमध्ये वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने पॉमेल हॉर्स, समांतर बार, रोमन रिंग्ज आदी सर्वच प्रकारांमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले. त्याने ७३.५५ गुणांची कमाई केली.

उत्तरप्रदेशच्या अग्निवेश पांडे याच्यावर त्याने निसटता विजय मिळविला. पांडे याने ७१.३५ गुणांसह रौप्यपदक मिळविले.

ओंंकार शिंदे या महाराष्ट्राच्याच खेळाडूने ब्राँझपदक घेताना घरच्या प्रेक्षकांना आणखी एका पदकाचा आनंद मिळवून दिला. त्याने ६९.४५ गुण नोंदविले.

महाराष्ट्राच्या अनास नासिर व उत्कर्ष मोरणकर यांना अनुक्रमे सहावे व सातवे स्थान मिळाले. या स्पर्धेत ४२ खेळाडूंंनी भाग घेतला.