एलईडी मोबाईल व्हॅनद्वारे खेलो इंडियाचा संदेश

पुणे। खेलो इंडियाचा संदेश देत क्रीडाविषयक उपक्रमांविषयी माहिती देणा-या एलईडी मोबाईल व्हॅन म्हाळुंगे बालेवाडीमध्ये विविध ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून खेलो इंडिया युथ गेम्सवर आधारित चित्रफीत आणि महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाची माहिती दाखविण्यात येत आहे.

केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ठेवण्यात आलेल्या या व्हॅनच्या उपक्रमाचा शुभारंभ युथ गेम्सच्या आयोजन समितीचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे आदी उपस्थित होते.

क्रीडानगरीच्या मुख्य प्रवेशद्वारासह चार ठिकाणी या व्हॅन उभ्या करण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या क्रीडाप्रेमींना या व्हॅनच्या माध्यमातून स्पर्धेसंबंधित माहितीपर व्हिडिओ क्लिप्स व इतर चित्रफिती पहायला मिळत आहेत.