खेलो इंडिया: टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत

पुणे। महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये सुवर्णपदकाच्या संधी निर्माण केल्या. मात्र तिची सहकारी गार्गी पवार हिला मात्र उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सेंटर कोर्टवर झालेल्या उत्कंठापूर्ण लढतीत प्रेरणा हिने आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिचे आव्हान संपुष्टात आणले. चुरशीने झालेला हा सामना प्रेरणा हिने ७-५, ६-४ असा जिंकला. प्रेरणा हिने क्रॉसकोर्ट फटक्यांबरोबरच बॅकहँड फटक्यांचाही सुरेख खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.

प्रेरणा हिला सुवर्णपदकासाठी गुजरातच्या प्रियांशी भंडारी हिच्याशी खेळावे लागणार आहे. प्रियांशी हिने एकतर्फी लढतीत गार्गी हिचा ६-२, ६-२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.