खेलो इंडिया- जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांचे सोनेरी यश

पुणे । महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामध्ये पदकांची लयलूट करताना सोमवारीही कौतुकास्पद यश मिळविले. त्यांच्या केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. रौप्यपदक मिळविणाºया खेळांडूमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू यांचा समावेश आहे तर साहिल पवार, साध्वी धुरी यांनी ब्राँझपदक मिळविले.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. अपेक्षा हिने १७ वर्षाखालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीचे सुवर्णपदक मिळविताना हे अंतर २ मिनिटे २७.५४ सेकंदात पार केले. याच वयोगटातील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत केनिशा हिने २७.२८ सेकंदात जिंकली.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात आकांक्षा बुचडे हिला २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर २ मिनिटे ३८.१३ सेकंदात पूर्ण केले. आकांक्षा हिची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. छोट्याशा अपघातामुळे तिला हातास मोठी दुखापत झाली होती व त्यामुळे तिला दोन अडीच महिने सराव करता आला नव्हता. ती सध्या विनय मराठे यांच्याकडे सराव करीत आहे. आजपर्यंत तिने कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटांमध्ये भरपूर पदकांची कमाई केली आहे.

राजस्थानच्या फिरदोष कयामखानी हिने येथील शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना २ मिनिटे ३४.११ सेकंद वेळ नोंदविली. याच वयोगटातील ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत शेरॉन साजू हिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. तिने रौप्यपदक मिळविताना ही शर्यत ३५.५२ सेकंदात पूर्ण केली. तामिळनाडूच्या ए.व्ही.जयवीणा हिने हे अंतर ३३.७६ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात रुद्राक्ष मिश्रा याने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना २५.०७ सेकंद वेळ नोंदविली. हरयाणाच्या वीर खाटकर याने ही शर्यत २४.७१ सेकंदात जिंकली. मुलींच्या २१ वर्षाखालील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साध्वी धुरी हिला ब्राँझपदक मिळाले. तिने हे अंतर २७.९० सेकंदात पार केले. कर्नाटकची दीक्षा रमेश (२७.६७ सेकंद) व गुजरातची माना पटेल (२७.८१ सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले.

मुलांच्या २१ वर्षाखालील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साहिल पवार याने २४.५३ सेकंद वेळ नोंदविली. त्याने गोव्याच्या जेरी डिमेलो याच्या साथीत संयुक्तपणे ब्राँझपदक मिळविले. कर्नाटकच्या एस.पी.लिकिथ याने ही शर्यत २४.१५ सेकंदात जिंकली. गोव्याचा झेवियर डिसूूझा याने रौप्यपदक मिळविताना हे अंतर २४.१७ सेकंदात पूर्ण केले.

मुलांच्या २१ वर्षाखालील १५०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याने रौप्यपदक पटकाविले. सुश्रुत याने ही शर्यत १६ मि. २४.६८ सेकंदात पूर्ण केली. दिल्लीच्या कुशाग्र रावत याने १५ मि. ५९.०६ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करीत सुवर्णपदक पटकाविले. तसेच दिल्लीच्याच विशाल गरेवाल याने १६ मि. ५७.७४ सेकंदात हे अंतर पूर्ण करीत कास्यंपदकाची कमाई केली.

मुलांच्या २१ वर्षाखालील ४ बाय १०० मीटर फ्री स्टाईल रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, साहिल पवार, सुश्रुत कापसे, अ‍ॅरॉन फर्नांडिस यांच्या संघाने ३ मि. ४३.५१ सेकंदात रिले पूर्ण करीत कास्यंपदकाची कमाई केली. कर्नाटकच्या संघाने ३ मि. ३३.६८ सेकंदात आणि दिल्लीच्या संघाने ३ मि. ४२.०९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.