खेलो इंडिया- वेटलिफ्टिंगकरीता जेरेमी लालरिन्हुंगा मुख्य आकर्षण

पुणे | युवा आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत गतवर्षी भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविणारा जेरेमी लालरिन्हुंगा हा खेलो इंडिया २०१९ च्या वेटलिफ्टिंग स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरणार आहे. जेरेमी या सोळा वर्षाच्या खेळाडूने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेतले होते. खेलो इंडिया गेम्सच्या पहिल्या स्पर्धेत तो सहभागी झाला होता. त्या वेळी त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना ६२ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले होते. तथापि यंदा तो स्वत: च्या राज्याचे (मिझोराम) प्रतिनिधित्व करणार आहेत आणि ६७ किलो गटात तो नशीब आजमावणार आहे.

उझबेकिस्तान येथे गतवर्षी झालेल्या आशियाई युवा व कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेरेमीचा समावेश करण्यात आला होता. त्याचा सहकारी जेकब वॅनलालटुंगा याने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यानेही गतवेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. यंदा मात्र तो मिझोरामकडून सहभागी होत आहे. जेरेमीप्रमाणेच त्यानेही आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट (पुणे) येथेच प्रशिक्षण घेतले आहे.

महाराष्ट्राची आशा युवकांमध्ये अभिषेक निपाणे (२१ वषार्खालील-६७ किलो) आणि मुलींच्या विभागात खुशाली गांगुर्डे (२१ वषार्खालील-४५ किलो) यांच्या कामगिरीवर आहे. त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. अभिषेक हा मनमाडचा विद्यार्थी असून त्याने गतवेळी खेलो इंडियामध्ये रौप्यपदक पटकाविले होते. तसेच त्याने गतवर्षी युवा व कनिष्ठ राष्ट्रीय स्पधेर्तील ४४ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणाचे वेटलिफ्टर चांगली कामगिरी करीत असून आता अरुणाचल प्रदेशातील मुलांनी राष्ट्रीय पातळीवर त्यांची कामगिरी उंचावली आहे. मुलींमध्ये मणिपूर वर्चस्व गाजवत आहे आणि मागील वर्षी त्यांनी खेलो इंडियामध्ये चार सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले होते. इतर राज्यांमधील पंजाब व उत्तराखंडमधील लिफ्टर्स प्रभावी कामगिरी करतील असे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक पाल सिंग संधू यांनी सांगितले.