खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्राच्या संघांचा प्रत्यक्ष मैदानावरील सरावाला प्रारंभ

पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या संघांनी महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे. देशभरातील विविध राज्यांतून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत असून येत्या ९ जानेवारीपासून या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.

महाराष्ट्राच्या हॉकी संघातील १७ आणि २१ वर्षाखालील मुले व मुलांच्या सराव शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडानगरीतील हॉकीच्या मैदानावर करण्यात आले होते. त्यामध्ये ऑलिंपियन अजित लाकरा, हॉकीच्या प्रशिक्षक आरती हळींगळी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

हॉकीसह कुस्ती, अ‍ॅथलेटिक्स, ज्युदो, कबड्डी, हॉलिबॉल आदी खेळांची सराव शिबीरे क्रीडानगरीमध्ये सुरु आहेत. याकरीता महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण सुरु झाले आहे.