जागतीक बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा आघाडीचा पुरुष एकेरीचा बॅटमिंटनपटू श्रीकांत किदांबी याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सेन याचा २१-१४,२१-१८ असा पराभव करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंकडून संयमी खेळ झाला. दोन्ही खेळाडू ४-४ अश्या बरोबरीत होते. त्यानंतर किदांबीने खेळ उंचावला आणि आघाडी ११-६ अशी केली. डेन्मार्कच्या खेळाडूने खेळात परतण्याचे संकेत देत गुणसंख्या १०-१३ अशी केली. किदांबी तीन गुणाने आघाडीवर होता. किदांबीने खेळण्याच्या शैलीत थोडा बदल करून आक्रमक पवित्र घेत विरोधी खेळाडूला संधी दिली नाही. पहिला सेट २१-१४ असा आपल्या नावे केला.

किदांबी दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासून डेन्मार्कच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवत ६-२ असा पुढे होता. दुसऱ्या सेटमध्ये जेव्हा ब्रेक देण्यात आला तेव्हा किदांबी ११-३ असा आघाडीवर होता. विश्रांतीनंतर अँटोन्सेन याने उत्तम खेळ केला पण किदांबीने त्याला आघाडी घेऊ दिली नाही. किदांबीने दुसरा सेट २१-१८ असा आपल्या नावे करत सामना जिंकला.

हा सामना जिंकण्यासाठी त्याला ४० मिनिटे लागली. मागील फेरीचा सामना जिंकण्यासाठी त्याने फक्त २८ मिनिटे घेतली होती. हा सामना जिंकल्याने श्रीकांत किदांबी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे.