किदांबी श्रीकांतची चायना ओपन सुपर सिरीजमधून माघार !

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने १४ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान छोटी दुखापत झाली आहे.

या बद्दल श्रीकांत म्हणाला,” मी चायना ओपनमधून माघार घेत आहे. माझ्या स्नायूंना ताण आला आहे आणि डॉक्टरांनी मला एका आठवड्याची विश्रांती घ्यायला सांगितली आहे. ही दुखापत मला राष्ट्रीय स्पर्धेच्या दरम्यान झाली पण मी तरीही खेळत राहिलो. त्यामुळे ही दुखापत आणखी वाढली. पण एका आठवड्यात मी बरा होईन.”

भारतीय बॅडमिंटन संघटनेने सांगितले की श्रीकांतला राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान दुखापत होणे हा योगायोग आहे. तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अनुप नारंग म्हणाले ” मला वाटत श्रीकांतच्या दुखापतीला राष्ट्रीय स्पर्धा जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे ठरेल. ही वेळ चुकीची आहे. “

“या स्पर्धेच्या तारखा खेळाडूंशी चर्चा केल्यानंतरच ठरवल्या होत्या आणि त्यांनी इच्छेने यात सहभाग घेतला होता. खरंतर, जर राष्ट्रीय स्पर्धा नसत्या तरी अनेक खेळाडू मकाऊ ओपन स्पर्धा खेळले असते. “

“या स्पर्धेत कोणत्याही खेळाडूला मोठी दुखापत झाली नाही. श्रीकांतची दुखापत लहान आहे, जी एका आठवड्याच्या विश्रांतीने बरी होईल. त्यामुळे तो हाँग काँग ओपन खेळेल. जिथे त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची संधी असेल.”

नारंग पुढे राष्ट्रीय स्पर्धेविषयी बोलताना म्हणाले,” राष्ट्रीय स्पर्धेचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धा घेणे खूप महत्वाचे असते. आम्ही यापुढेही या स्पर्धा खेळाडूंशी चर्चा करून त्यांच्या सोईनुसार आयोजित करू. जर अश्या स्पर्धा नसतील तर खेळाडूंची पुढची पिढी समोर येणार नाही. भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी अश्या स्पर्धा महत्वाच्या आहेत.”

चायना ओपन स्पर्धा १४ ते १९ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच २१ नोव्हेंबर पासून हाँग काँग सुपर सिरीज चालू होणार आहे. या स्पर्धेत श्रीकांत खेळणार आहे. यात श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची संधी आहे. या वर्षी श्रीकांतने ४ सुपर सिरीज विजेतीपदे मिळवली आहेत.