किदांबी श्रीकांत याची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी शिफारस !

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीसाठी हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. फ्रेंच ओपन सुपर सिरीज जिंकल्यानंतर आज बुधवारी माजी क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी श्रीकांतच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू बनला आहे, ज्याने एका वर्षात चार किंवा त्यापेक्षा जास्त सुपर सिरीज जिंकण्याची किमया केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू आहे.

गोयल हे सध्या संसदीय कार्य मंत्री असून त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांना एक पत्र लिहले आणि त्यात त्यांनी श्रीकांत किदांबी याची देशातील चौथ्या सर्वोच्य नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली.

या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर होती, तरी देखील गोयल यांनी किदांबीच्या नावाची शिफारस केली.
” या खेळातील योगदानाला महत्व देऊन भारतातील तरुण खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.” असे गोयल यांनी त्या पत्रात लिहले आहे. केंदीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर विजय गोयल यांच्याकडील क्रीडामंत्री पद राजवर्धनसिंग राठोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.

“तो भारतातील एक आदर्श तरुण आहे आणि करोडो भारतीयांना असे वाटते की त्याच्या कामगिरीची दाखल घेतली जावी. अनेक लोकांनी मला माजी क्रीडा मंत्री असल्याच्या नात्याने त्याचे नाव या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी पाठवण्याचे आव्हान केले. त्यानुसार भारतीयांच्या आकांशा प्रतिबिंबित करण्याच्या हेतूने, मी श्री श्रीकांत किदांबी याच्या नावाची शिफारस पद्मश्री पुरस्कारासाठी केली आहे.” असे गोयल यांनी या पात्रात लिहले आहे.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
श्रीकांतच्या अगोदर पुरुष एकेरीमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज जिंकण्याची कामगिरी चायनीज महान खेळाडू लिन डॅन, चेन लॉन्ग आणि मलेशियाचा स्टार खेळाडू ली चोंग वेई यांनीच केली आहे