जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा: किरण क्रिकेट अकादमीची विजयी सलामी

पुणे। युनायटेड स्पोर्ट्स क्लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अथर्व पाटील याने केलेल्या 63 धावांच्या खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा 59 धावांनी पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किरण क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 160 धावा केल्या. यात अथर्व पाटीलने 53 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने 63 धावा, रेहान तांबोळीने 26 चेंडूत 27 धावा, रुद्रव श्रीभातेने 17 धावा व वरद पाटीलने नाबाद 16 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. व्हिजन क्रिकेट अकादमीकडून संस्क्रुत गायकवाड(2-40), तेजस येवले(1-37), रजत देवकर(1-19)यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अकादमीने 20षटकात 5 बाद 101धावापर्यंतच मजल मारता आली. यात प्रकाश मल्लिका शेट्टी नाबाद 24, सराफ श्रेय नाबाद 15 यांनी थोडासा प्रतिकार केला. किरण क्रिकेट अकादमीकडून हर्ष कनोजिया(2-23), रेहान तांबोळी(1-9), राणा सरनोबत(1-15) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर हा ‘किताब अथर्व पाटील याला देण्यात आला.

स्पर्धेचे उदघाटन ममी पोको पँट्स-युनीचार्म इंडियाच्या पश्चिम विभागाच्या विक्री व विपणनचे प्रमुख अनिरुद्ध सिंग चौहान, प्रकाश टिंगरे मैदानाचे मालक योगेश टिंगरे व अजय टिंगरे, महाराष्ट्राचे माजी रणजीपटू प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी रणजीपटू जयदीप नारसे, जस क्रिकेट अकादमीचे संचालक आणि महाराष्ट्राचे माजी रणजीपटू पराग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

साखळी फेरी:

किरण क्रिकेट अकादमी: 20षटकात 6 बाद 160धावा(अथर्व पाटील 63(53,7×4, 3×6), रेहान तांबोळी 27(26,2×4), रुद्रव श्रीभाते 17(19), वरद पाटील नाबाद 16, संस्क्रुत गायकवाड 2-40, तेजस येवले 1-37, रजत देवकर 1-19) वि.वि.व्हिजन क्रिकेट अकादमी: 20षटकात 5 बाद 101धावा(प्रकाश मल्लिका शेट्टी नाबाद 24(18), सराफ श्रेय नाबाद 15(14), हर्ष कनोजिया 2-23, रेहान तांबोळी 1-9, राणा सरनोबत 1-15);सामनावीर-अथर्व पाटील; किरण क्रिकेट अकादमी 59 धावांनी विजयी.