तिसरी कसोटी: के एल राहुलचे शतक थोडक्यात हुकले !

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात लंच ब्रेकनंतर भारताला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर के एल राहुल १३५ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला आहे.

राहुल आणि धवन भारताने नाणेफेक जिंकल्या नंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आणि दोघेही पहिल्या षटकापासूनच लयमध्ये दिसत होते. पण पुष्पाकुमारा ४०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूला पुढे येऊन षटकार मारण्याच्या नादात राहुलने चेंडू उंच हवेत उचलला आणि करुणारत्नेने अचूक झेल टिपत त्याला बाद केले. जरी के एल राहुल बाद झाला असला तरी भारत २१५ वर १ बाद अश्या मजबूत स्थितीत आहे.

केएल राहुलच्या सात सलग डावातील अर्धशतकी खेळी या ९०, ५१, ६७,६०, ५१*,५७, ८५ अशा राहिल्या आहेत. त्याने नाबाद ५१ धावांची खेळी धरमशाला कसोटी येथे केली आहे. के एल राहुलच्या अर्धशतकी खेळींचा सिलसिला हा ४ मार्चच्या बेंगलोर कसोटीपासून सुरु झाला आहे.