हा विक्रम करून कोहलीने टाकले मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे

जोहान्सबर्ग। भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा काही तरी विक्रम करत असतो. कालही त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध पार पडलेल्या चौथ्या वनडेत अर्धशतकी खेळी करून माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले आहे.

विराटने आता वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे. त्याने ही कामगिरी फक्त २०६ सामन्यात खेळताना केली. विराटने २०६ सामन्यात ३४ शतके आणि ४६ अर्धशतकांच्या साहाय्याने ५७.४५ च्या सरासरीने ९४२३ धावा केल्या आहेत. अझरुद्दीन यांनी ३३४ सामन्यात ९३७८ धावा केल्या होत्या.

या यादीत त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि एम एस धोनी आहेत. याबरोबरच विराट वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये १६ वा खेळाडू बनला आहे. या यादीतही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच अव्वल स्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा असून तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंग आहे.

विराटने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात वनडेतील ३४ वे शतक साजरे केले होते हे शतक करताना त्याने गांगुलीच्या कर्णधार म्हणून केलेल्या ११ शतकांना मागे टाकले होते. विराटाचे ते कर्णधार म्हणून १२ वे शतक होते.

याबरोबरच विराट वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे ४९ षटकांसह तेंडुलकर आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

सचिन तेंडुलकर: १८४२६ धावा, ४६३ सामने
सौरव गांगुली: ११३६३ धावा, ३११ सामने
राहुल द्रविड: १०८४३ धावा, ३४१ सामने
एम एस धोनी* : ९९५४ धावा, ३१६ सामने
विराट कोहली*: ९४२३ धावा, २०६ सामने