विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

बेंगलोर | गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात बेंगलोरने हैद्राबादवर १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी केलेल्या बेंगलोरने हैद्राबादसमोर २० षटकांत जिंकण्यासाठी २१९ धावांचे लक्ष ठेवले आहे.

एबी डिविलियर्स ६९, मोईन अली ६५, कोलिन डे ग्रॅडोहोम ४० आणि सर्फराज खान २२ यांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर बेंगलोरने २० षटकांत ६ विकेट गमावत २१८ धावा केल्या.

याला उत्तर देताना हैद्राबादने २० षटकांत ३ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कर्णधार केन विलियमसन ८१ आणि मनिष पांडे ६२ यांनी चांगल्या धावा केल्या परंतु संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरले.

या सामन्यात काल सर्वाधिक चर्चा जर कुणाची झाली असेल तर ती आहे एबी डी विलियर्सची. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी दोन्ही आघाड्यांवर त्याने चमकदार कामगिरी केली.

फलंदाजीत त्याने १२ चौकार आणि १ षटकार खेचत ३९ चेंडूतच ६९ धावा केल्या तर क्षेत्ररक्षण करत असताना अॅलेक्स हेलचा मोईन अलीच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.

हेलने हवेत मारलेला झेल हा सीमारेषेवर उंच उडी मारत त्याने इतक्या सहजतेने पकडला की कर्णधार कोहलीनेही या झेलाचा जोरदार आनंद साजरा केला.

यानंतर लगेचच या हंगामातील सर्वोत्तम झेल अशी याची चर्चा होऊ लागली. “असे झेल ही सामान्य माणसं घेऊ शकत नाही. मी आज स्पायडरमॅनला पाहिले. तो फलंदाजीही अप्रतिम करतो आणि त्याच्या या क्षेत्ररक्षणाची आता मला सवय झाली आहे. ” असे विराट यावेळी आपला संघसहकारी एबी डी विलीयर्सच कौतुक करताना म्हणाला.

पहा हा झेल-