विराट की स्मिथ कोण आहे शेन वॉर्नच्या मते उत्कृष्ट कसोटी फलंदाज !

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे आत्ताच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज आहेत.

त्यामुळे या दोघांमध्ये सतत स्पर्धा बघायला मिळते. या दोघांविषयी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपली मते मांडली आहेत.

विराट आणि स्मिथविषयी बोलताना वॉर्न म्हणाला, ” विराट कोहली आणि स्मिथ यांच्यामधील एकाची उत्कृष्ट कसोटी फलंदाज म्हणून निवड करणे सध्या तरी खरंच अवघड आहे आणि उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धात्मक खेळायला आवडते.”

विराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २८१८ धावा केल्या आहेत तर स्मिथने १३३७ धावा केल्या आहेत. स्मिथ या वर्षात अजून दोन कसोटी सामने खेळणार आहे.

विराटला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो आता थेट ५ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळेल.

सध्याच्या आयसीसी क्रमवारीत विराट वनडे आणि टी २० प्रकारात अव्वल स्थानी आहे, तर स्मिथ कसोटीत अव्वल क्रमांकावर आहे.

याबरोबरच वॉर्नने इंग्लंडच्या खेळाडूंना स्मिथशी शाब्दिक चकमक करू नका असा उपदेश केला आहे. अश्या शाब्दिक वादामुळे स्मिथला आणखी चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते.

वॉर्नने याबद्दल ब्रायन लाराची आठवण सांगून उदाहरण दिले आहे. तो म्हणाला आम्ही जेव्हा लाराला डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ७ ते ८ शतके केली होती त्यानंतर मात्र आम्ही त्याला डिवचण्याची योजना बंद केली.