चाहत्यांनी विराटला विचारला जाब! तुला अरिजितचे गोडवे गायला वेळ आहे पण

भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याच्या बीसीसीआयच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद निर्माण झाले होते. कुंबळेसारख्या महान गोलंदाजाला बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘भारताचा माजी गोलंदाज’ असा उल्लेख केला.

ही पोस्ट ट्विटरवर शेअर केल्यानंतर ट्विटरकरांच्या रागाचा उद्रेक झाला. कुंबळे चाहत्यांनी बीसीसीआयला जाब विचारल्यानंतर बीसीसीआयने ती पोस्ट काढून टाकली आणि त्या पोस्टच्या जागी दुसरी पोस्ट शेअर केली. दुसऱ्या पोस्टरमध्ये अनिल कुंबळेला दिग्गज खेळाडू म्हणून उल्लेखले गेले आहे.

पण या सर्व प्रकरणात भारताचा कर्णधार विराट कोहली याने मौन धारण केले त्याबद्दल एकही ट्विट केला नाही. त्याचबरोबर त्याने भारताच्या माजी प्रशिक्षकाला ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.

हा सर्व प्रकार ट्विटरकरांच्या लक्षात आला आणि विराट कोहलीवर ट्विटरवर प्रश्नांचा वर्षाव झाला.

विराटने मागील वर्षी अनिल कुंबळेला ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण या वर्षी त्याने असे का केले नाही ? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमींना पडला आहे.