केपीआयटी, आयबीएम संघाचे विजय

पुणे। केपीआयटी आणि आयबीएम संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत केपीआयटी संघाने झेन्सर संघावर ९९ धावांनी मात केली. केपीआयटी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७५ धावा केल्या. यात अलोक नागराजने ३९ चेंडूंत ८ चौकारांसह ५२, तर तुषार वैंगणकर याने ५९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावा केल्या. अलोक-तुषार जोडीने ९९ धावांची सलामी दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना झेन्सरला ९ बाद ७६ धावाच करता आल्या.

दुस-या लढतीत आयबीएम संघाने सिनरझिप संघावर ४२ धावांनी मात केली. आयबीएम संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५६ धावा केल्या. यात तळाच्या विजयकुमारने २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४८ धावा करून आयबीएम संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर आयबीएमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून सिनरझिपच्या संघाला १९.३ षटकांत ११४ धावांत रोखले.

संक्षिप्त धावफलक –

१) केपीआयटी – २० षटकांत ५ बाद १७५ (तुषार वैंगणकर ७९, अलोक नागराज ५२, अंबर दंडगव्हाळ नाबाद २६, अनिल त्रिपाठी ३-२३, मुझमिल खान २-४५) वि. वि. झेन्सर – २० षटकांत ९ बाद ७६ (भरत झव्हेरी ३०, उत्कर्ष अगरवाल १९, निरंजन फडणवीस ३-२८, मयुरेश लिखिते २-८).

२) आयबीएम – २० षटकांत ८ बाद १५६ (विजयकुमार नाबाद ४८, धरमवीरसिंग २१, किरण लगड १५, रामेश्वर केंद्रे २-१७, शैलेश तुरिया २-२०) वि. वि. सिनरझिप – १९.३ षटकांत सर्वबाद ११४ (संदीप कांबळे ३०, शैलेश तुरिया २५, नागमणी प्रसाद १८, शिव प्रसाद ३-१७, विजयकुमार २-२२, किरण लगड २-१३, संचित मेहता २-१८).