संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत के.आर.पी. इलेव्हन, दादर पारसी कॉलनी उपांत्य फेरीत 

शुभम खरात (२४/७) व अथर्व भोसले या डावखुऱ्या गोलंदाजांची कमाल

मुंबई:  दादर पारसी कॉलनीचा शुभम खरात (२४/७) आणि के.आर.पी. इलेव्हन संघाचा अथर्व भोसले (४७/५) या डावखुऱ्या गोलंदाजांनी यांनी ७व्या संतोष कुमार घोष १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी धमाल उडवत आपल्या संघांना उपांत्य फेरीतील प्रवेश मिळवून दिला.
स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित या स्पर्धेत के.आर.पी. संघाने शिवाजी पार्क जिमखाना संघावर १५० धावांनी तर दादर पारसी कॉलनी संघाने माझगाव सी.सी. संघाला १५१ धावांनी पराभूत केले. त्यांच्यासह स्टायलो क्रिकेटर्स आणि न्यू ईरा या दोन संघांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या ‘लो स्कोरिंग’ लढतीत स्टायलो क्रिकेटर्सने माहीम ज्युवेनाईल्स संघाला पहिल्या डावातील आघाडीवर पराभूत केले. स्टायलो संघाने पहिल्या डावात ३५ धावांची नाममात्र आघाडी मिळविल्यानंतर माहीम ज्युवेनाईल्स संघाने झटपट ७ बाद १२२धावांवर डाव घोषित करून स्टायलो समोर ३२ षटकात ८७ धावांचे आव्हान ठेवले.
खेळ संपला तेव्हा स्टायलो संघाची ८ बाद ८१ अशी अवस्था होती. माहीमचा डावखुरा फिरकी गोलंदाज आयुष झिमरे याने २९/५ बळी मिळवत प्रयत्नांची शर्थ केली. पण संघाला मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
न्यू ईरा संघाच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बलाढ्य एम.आय.जी. संघाने एकावेळी बिनबाद १०५ धावा अशी चांगली सुरुवात केली होती. मात्र तेजस चव्हाण (३९) आणि अर्जुन दाणी (६६) लागोपाठ बाद झाले आणि २ बाद १०७ वरून बघता बघता त्यांचा डाव १६७ धावांत कोसळला. पुन्हा एकदा डावखुरा फिरकी गोलंदाज अमन मणिहार (६३/५) हा न्यू ईरा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 
के.आर.पी. इलेव्हनच्या ३०४ धावांच्या डोंगरासमोर शिवाजी पार्क जिमखाना संघाने सपशेल शरणागती पत्करली आणि त्यांचा डाव १५४ धावातच आटोपला. अथर्व भोसले (४७/५), सुमीत जोशी (१६/२) आणि गौरव कुमार (२६/२) या फिरकी गोलंदाजांनी ही कमाल केली. 
संक्षिप्त धावफलक : के.आर.पी.इलेव्हन -७१ षटकात ३०४ (आयुष जेठवा १६१, गौरव कुमार ५७, आदित्य जाधव ८३/३,हर्ष साळुंखे ४२/३, रोहित जोशी ५७/२) वि.वि. शिवाजी पार्क जिमखाना ७२.२ षटकात सर्वबाद १५४ (राज देशमुख ४०, हर्ष साळुंखे २४, अथर्व चव्हाण २४, अथर्व भोसले ४७/५, सुमित जोशी १६/२, गौरव कुमार २६/२) सामनावीर – आयुष जेठवा 
दादर पारसी कॉलनी – ८७.५ षटकात सर्वबाद २७२ (आदित्य वारंग ४७, तन्मय भूरम ३१, रोनित ठाकूर ११६, करण सुरैया ३०, यश कृपाल ९१/५, आर्यन शेट्टी ७९/२, वरद शिंदे २५/२) वि.वि. माझगाव सी.सी. ५३.२ षटकात १२१ (अमर वर्मा २३, यश कदम ५७, शुभम खरात २४/७, जश गानिगा २८/२) सामनावीर- रोनित ठाकूर
न्यू इरा – ४५.५ षटकात सर्वबाद १८७(अभिनव सिंघ ३९, मोहित तनवर २६, श्रेयस मांडलिक ४४, जय धात्रक ७४/३, झेद पारकर २१/२, जय जैन २८/२) वि.वि. एम.आय.जी. ७८.१ षटकात १६७ (तेजस चव्हाण ३९,अर्जुन दानी ६६, निलय पवार २५, अमन मणिहार ६३/५, अभिषेक जैस्वाल ३६/२, श्रेयस मांडलिक ३५/२) सामनावीर – श्रेयस मांडलिक 
माहीम ज्युवेनाईल्स ३०.४ षटकात सर्वबाद ११७ (वेदांत गढीया ४३, सूर्यांश शेडगे ४२, अरुण गुप्ता ३६/५, आदिल शेख २१/३) आणि १९ षटकात ७ बाद १२२ डाव घोषित (सूर्यांश शेडगे ४७, , मयंक तेओतीया ३३,फरहान शेख ३९/३, अनुराग सिंघ २१/२) पराभूत  वि. स्टायलो क्रिकेटर्स –  ५८.५ षटकात सर्वबाद १५४  (रोषण कनोजिया २१, आदिल शेख नाबाद ४४,मोईन खान १२/२,सूर्यांश शेडगे ६०/४,वेदांत गडिया १३/२) आणि ३२ षटकात ८ बाद ८१ (आयुष झिमरे २९/५, वेदांत गडिया ३८/२)सामनावीर – आदिल शेख.