कुलदीप यादव या लेग स्पिनर पेक्षाही चांगला गोलंदाज : शेन वॉर्न

यासिर शहापेक्षा ही तो चांगली गोलंदाजी करेल असे वॉर्नचे मत आहे.

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याच्या मते भारताचा युवा चायनामॅन लेग स्पिनर कुलदीप यादव हा जगातील सर्वोत्तम लेग स्पिनर बनू शकतो. पाकिस्तानचा स्टार लेग स्पिनर यासिर शहापेक्षा ही तो चांगली गोलंदाजी करेल असे त्याचे मत आहे.

कुलदीप यादवने कसोटी, वनडे आणि टी-२० तीनही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण या वर्षीच केले आहे. २०१७च्या सुरुवातीला त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीमध्ये ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने हॅट्रिक घेतली होती.

शेन वॉर्नने ट्विटर वर ट्विट टाकून कुलदीपचे कौतुक केले.

ट्विटमध्ये शेन म्हणतो की जर कुलदीप सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना संयम ठेऊ शकला तर तो जगातील सर्वोत्तम लेग स्पिनर बनण्यासाठी यासिर शहाला टक्कर देऊ शकतो.

त्यावर कुलदीप यादवने लगेचच त्याचे आभार मानले व म्हणाला, “मी हे नक्की लक्षात ठेवेन, धन्यवाद. लवकरच भेटू.”

त्याच बरोबर कुलदीपचे कौतुक करणारे आणखीन एक ट्विट त्याने टाकले होते.

कुलदीप यादवची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अजून खूप नवीन आहे. त्याने भारताकडून फक्त २ कसोटी, ११ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्याच्या बरोबर त्याची तुलना केली जात आहे त्या यासिर शहाने पाकिस्तानकडून २६ कसोटी, १७ वनडे आणि २ टी२० खेळल्या आहेत. पण शेन वॉर्न सारख्या महान लेग स्पिनरने जर कुलदीपचे कौतुक केले असेल तर मग त्याने नक्कीच त्याच्यामध्ये असा काही गुण बघितला ज्यमुळे कुलदीप महान लेग स्पिनर्सच्या पंगतीत बसू शकतो असे त्याला वाटले.