कुमार संगकारा माझा आदर्श: स्म्रिती मानधना

भारताची धडाकेबाज महिला सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधना हिने पुणे येथे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी तिचे क्रिकेटमधील आदर्श, विश्वचषकातील अनुभव आणि अनेक गोष्टींवर पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले.

तुझा आदर्श कोण या प्रश्नावर बोलताना ती म्हणाली,” लहानपणी मी जास्त क्रिकेट पहिले नाही. त्यामुळे लहानपणी माझा भैयाच माझा आदर्श होता. त्यानंतर मी जशी क्रिकेट पाहायला सुरुवात केली. त्यानंतर कुमार संघाकारा माझा आदर्श बनला. फलंदाजीतील आक्रमकतेसाठी ऑस्ट्रेलियाचा हेडनला मी आदर्श मानते.”

अपेक्षितपणे डावखुऱ्या स्म्रितीचे आदर्शही डावखुरेच फलंदाज आहेत.

एका प्रश्नाला उत्तर देताना स्म्रिती म्हणाली,”त्यावेळी मैदानावर मी एकटीच मुलगी असायचे, त्यामुळे माझ्याकडे सर्वांचे जास्त लक्ष्य असायचे. गॉसिपिंग सारख्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या नाहीत. याउलट मी मुलगी असल्याने माझा जास्त सराव व्हायचा. बाकीचे मुले मला जास्त फलंदाजीची करायला द्यायची, याचा मला पुढे खूप फायदा झाला.”

विश्वचषकातील प्रवास हा खूप अविस्मरणीय होता. या विश्वचषकानंतर जीवन खूपच बदलले गेल्याचेही तिने सांगितले. आता सांगलीत मला माझी गाडी घेऊन बाहेर जाणे देखील अवघड झाले आहे, असे स्म्रिती म्हणाली. या परिषदेनंतर स्म्रितीसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींनी खूप गर्दी केली.