वाढदिवसाच्या दिवशीच त्याचे द्विशतक ४ धावांनी हुकले

चितगाव । आज श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कुशल मेंडिसचे द्विशतक केवळ ४ धावांनी हुकले. त्याने ३२७ चेंडूचा सामना करताना १९६ धावा केल्या.

कुशल मेंडिस आज आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी द्विशतक करणारा केवळ तिसरा खेळाडू बनण्याचा त्याला आज मान मिळणार होता. परंतु त्याला तिजुल इस्लाम या गोलंदाजाने बाद केले.

यापूर्वी पत्सी हेंडरेन आणि जेसन गिलेस्पी याच खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. तसेच कसोटीत द्विशतक करणारा श्रीलंकेचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही याचमुळे हुकला.

कुशल मेंडिस हा आजपर्यंत दोन वेळा १९०-१९९मध्ये बाद झाला आहे. श्रीलंकेकडून केवळ कुमार संगकाराने अशी कामगिरी केली आहे.

त्याच्या ह्याच खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने बांगलादेश विरुद्ध पहिल्या डावात ३ बाद ४३४ धावा केल्या आहेत.