मबाप्पे, डेम्बले आणि जेसूस ‘गोल्डन बॉय’ पुरस्काराच्या शर्यतीत अग्रेसर

युरोपातील २१ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ‘गोल्डन बॉय’ पुरस्कारासाठी २५ खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. या पुरस्कारासाठी पॅरिस सेंट जर्मेन संघाचा कॅलिअन मबाप्पे, बार्सेलोनाचा ओस्माने डेम्बले आणि मँचेस्टर सिटीचा गॅब्रियल जेसूस या तीन खेळाडूंचा २५ खेळाडूंमध्ये समावेश आहे. हा पुरस्कार जिंकण्याची नामी संधी मबाप्पे, डेम्बले या खेळाडूंना आहे.

हा पुरस्कार इटालीयन वृत्तपत्र टूटो स्पोर्ट्स देते. या पुरस्कारासाठीच्या विजेत्यांची निवड ही काही निवडक पत्रकारांची समिती करते. या वृत्तपत्राने ‘लिडिंग ट्रायो’ या शीर्षकाखाली ही नावे जाहीर केली.

मबाप्पे याने गत मोसमात मोनॅको संघाकडून खेळताना खूप प्रभावी कामगिरी केली आणि या संघाला ‘सिरीज ए’ चे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मोनॅको संघाला चॅम्पियन्स लीगमध्ये सेमी-फायनलपर्यंत घेऊन जाण्यात देखील मबाप्पेचा मोठा वाट होता.

डेम्बले याचा मागील मोसमात खेळ दर्जेदार झाला होता. त्याने ब्रोशिया डॉर्टमंडसाठी खेळताना मागील मोसमाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने बार्सेलोना संघाचे लक्ष स्वतःकडे खेचण्यात यश मिळवले आणि तो आता बार्सेलोना संघाचा भाग आहे. परंतु दुखापतग्रस्त असल्याने तो सध्या मैदानाबाहेरच आहे.

गॅब्रियल जेसूस मँचेस्टर सिटीचा हा खेळाडू पेप गार्डिओला यांचा चहेता खेळाडू आहे. मागील मोसमात जेसूस याला संघात नियमित स्थान मिळत नव्हते आणि काही काळ तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहिला. या मोसमात जेसूस भन्नाट लयीत आहे. त्याने आजपर्यंत सिटीसाठी २२ सामने खेळले असून त्यात त्याने १५ गोल केले आहेत.

मागील वर्षीचा विजेता खेळाडू पोर्तुगालचा रेनोटा सांचेझ आणि मँचेस्टर युनिटेडचा स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्ड यांना २५ खेळाडूंच्या यादीत स्थान तर मिळाले आहे परंतु हे दोघे अंतिम तीन मध्ये स्थान बनवण्यात अपयशी ठरले आहेत.