भारताचा आज किर्गिज़स्तानशी महत्वपूर्ण सामना

भारतीय फ़ुटबाँल संघ सध्या चांगल्याच लयीत आहे. नेपाळ विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे संघाचे मनोबल देखील उंचावले आहे. तसेच आपल्या कामगिरीत सातत्य असल्यामुळे क्रमवारीत स्थान कायम सुधारत राहिले आहे. फिफा क्रमवारीत १०० व्या स्थानी झेप घेतल्यावर अनेक भारतीय फुटबॉलप्रेमी आनंदी झाले होते. गेल्या २ दशकातली ही भारताची क्रमवारीतली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

आज भारताचा सामना किर्गिज़स्तान सोबत होणार आहे. २०१९ च्या एएफसी एशियन कपच्या पात्रतेसाठी हा महत्वाचा सामना असणार आहे. बेंगुलूरुच्या कांतिवीरा मैदानावर हा सामना खेळवला जाईल. किर्गिज़स्तान फिफा क्रमवारीत १३२ व्या स्थानी विराजमान असले तरी त्यांना किरकोळ प्रतिस्पर्धी म्हणून गाफील राहून चालणार नाही.

२०१२ साली किर्गिज़स्तान फिफा रँकिंगमध्ये १९९ व्या म्हणजे शेवटच्या स्थानी होते आणि आज ते १३२ व्या स्थानी आहेत. किर्गिज़स्तानचा संघ भारताला नवखा नाही कारण त्यांचे ३ खेळाडू या आधी आय-लीग मध्ये खेळले आहेत. किर्गिज़स्तानचा बचाव हा मजबूत आहे, एक भक्कम संघ म्हणून त्यांना ओळखले जाते. किर्गिज़स्तान बरोबरच भारतचा देखील बचाव सुरेख आहे संदेश झिंगन, नारायण दास, प्रीतम कोटल हे आपले भक्कम बचावपटू आहेत.भारताला

हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. या सामन्यात विजय मिळवून उरलेल्या ४ सामन्यात दोन विजय मिळवले तर भारताचा एशियन कपचा रास्ता मोकळा होईल यात काही शंका नाही.