मलिंगा करतोय निवृत्तीचा विचार

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्तीचा विचार करत आहे. याबदल त्यानेच माहिती दिली आहे. मलिंगा सध्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून त्याला दुखापतींमुळे बऱ्याचदा सामन्यांना मुकावे लागले आहे .

यामुळेच तो आता निवृत्तीचा विचार करत आहे. मलिंगा निवृत्तीच्या विचारावर म्हणाला, “मासिकदृष्ट्या मी क्रिकेट खेळून थकलो आहे. मला नाही वाटत मी आणखी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. मी माझी निवृत्ती जाहीर करण्याचा विचार करतोय.”

पुढे मलिंगा म्हणाला, “मी अजून श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी बोललो नाही पण जेव्हा मी परत जाईल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळेल, त्यावेळेस माझे शरीर मला कसे साथ देते हे पाहावे लागेल. पण आता माझी आयपीएल कारकीर्द संपली आहे आणि मी मुंबई इंडियन्स बरोबर माझी नवीन इंनिंग चालू करणार आहे. कदाचित मी पुढे खेळू शकणार नाही. “

मलिंगा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. परंतु यावर्षीच्या आयपीएलसाठी त्याच्यावर कोणत्याच फ्रॅन्चायझींनी बोली लावली नाही. त्यामुळे तो यावर्षी मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम करेल.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही मुंबई इंडियन्स संघात मलिंगा बरोबर खेळला आहे. तसेच बुमराहच्या कारकिर्दीत मलिंगाचे मार्दर्शन महत्वाचे ठरले आहे असे बुमराहनेच सांगितले होते.

मलिंगा आयपीएल कारकिर्दीबद्दल म्हणाला, “प्रत्येकाला निवृत्तीचा संकेत मिळतो. वासिम आक्रमलाही माहित होते की आपली निवृत्तीची कोणती वेळ आहे. मला आयपीएलमध्ये मुंबई संघात कायम न केल्याचे आश्चर्य वाटले नाही.”

“मुंबई इंडियन्स बरोबरची १० वर्षे चांगली होती आणि मी खूप काही मिळवले आहे. पण यावर्षी संघमालक माझ्याशी बोलले होते आणि त्यांनी त्यांची पुढे जाण्याच्या योजनेबद्दलही सांगितले होते. त्यांना पुढील तीन वर्षासाठी चांगला संघ तयार करायचा आहे. आणि मलाही समजले आहे की स्पर्धात्मक क्रिकेटमधील माझी वेळ आता संपलेली आहे.”

मलिंगाने याबरोबरच असेही सांगितले की मार्गदर्शक म्हणून नवीन इंनिंग चालू करताना त्याला आनंद होत आहे. तसेच त्याला पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची आणि त्याचे ज्ञान त्यांना देण्याची चांगली संधी मिळणार आहे.