महान टेनिसपटू लिएंडर पेस ४४ वर्षांचा

भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस आज ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी १९७३ साली या महान खेळाडूचा जन्म कोलकाता येथे झाला.

लिएंडर पेस हा भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखला जातॊ. १९९१ साली कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पेसने आजही खेळाचा पेस काही कमी केलेला नाही. वयाच्या १८व्या वर्षी व्यावसायिक टेनिसला प्रारंभ केलेला हा खेळाडू आजही त्याच तडफेने टेनिस खेळतो.

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ साली वयैक्तिक प्रकारात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. त्यानंतर जवळजवळ ५० वर्षांनी अर्थात १९९६ साली भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले तेही याच खेळाडूकडून. लिएंडरने हे पदक पुरुष एकेरीत मिळवले हे विशेष.

त्यानंतर या खेळाडूने कधी मागे वळून पहिलेच नाही. १९९२ सालापासून या खेळाडूने सर्वच ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. एवढा दीर्घकाळ ऑलिम्पिकमध्ये देशाचं नेतृत्व करणारा लिएंडर एकमेव खेळाडू आहे.

१९९९ साली लिएंडरने महेश भूपतीबरोबर पहिल्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर २०१६ पर्यंत हा खेळाडू या स्पर्धांमध्ये जिंकत आला आहे. लिएंडरच्या नावावर सध्या ८ पुरुष दुहेरी आणि १० मिश्र दुहेरीची ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. १९९९ साली लिएंडरने मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीच विम्बल्डनच विजेतेपद मिळवून एक वेगळाच विक्रम आपल्या नावावर केला होता. तीन दशकात ग्रँडस्लॅम स्पर्धांचं विजतेपद जिंकणारा पेस हा महान टेनिसपटू रॉड लोव्हर नंतर केवळ दुसरा टेनिसपटू आहे.

भारत सरकारने या खेळाडूला आजपर्यन्त राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पदमश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविले आहे.

महा स्पोर्ट्सकडून या महान खेळाडूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!