डेव्हिस कप संघ जाहीर: लिएंडर पेसला वगळले

भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याला कॅनडा विरुद्ध जागतिक गटाच्या प्ले ऑफ लढतीसाठी वगळण्यात आले आहे. साकेत मायेनेनी आणि युकी भांब्री यांनी मात्र संघात पुनरागमन केले आहे.

नॉन प्लेयिंग कर्णधार महेश भूपतीसह संघात युकी भांब्री, साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन आणि रोहन बोपण्णा यांचा समावेश आहे. राखीव खेळाडूंमध्ये प्रजनेश गुंनेश्वरन आणि एल श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे.

साकेत मायेनेनी आणि युकी भांब्री हे दोंन्ही खेळाडू दुखापतीमुळे बेंगलोर येथे झालेली उझबेकिस्तानची लढत खेळले नव्हते.

४४वर्षीय लिएंडर पेसचा बेंगलोर येथे उझबेकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीत संभाव्य संघात समावेश होता. परंतु अंतिम ४ खेळाडूंमध्ये त्याला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे पेसने ती लढत अर्ध्यात सोडून फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांच्या मार्फत नॉन प्लेयिंग कर्णधार महेश भूपतीवर निशाणा साधला होता.

सध्या भारताकडून सर्वोत्तम दुहेरीची क्रमवारी असलेला खेळाडू रोहन बोपण्णा असल्यामुळे त्याची निवड होणे सहाजिकच होते. पेसला डेव्हिसकपमध्ये सार्वधिक सामने दुहेरीमध्ये जिंकणारा खेळाडू बनण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे.

कॅनडाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस कप लढतीसाठी भारतीय संघ:
खेळाडू: युकी भांब्री, साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन आणि रोहन बोपण्णा
नॉन प्लेयिंग कर्णधार: महेश भूपती
राखीव खेळाडू: प्रजनेश गुंनेश्वरन आणि एल श्रीराम बालाजी