विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर पेक्षा १३ डाव कमी खेळताना केला मोठा विश्वविक्रम

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात  आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारत या सामन्यात 43 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताकडून या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विराटचे आॅस्ट्रेलिया विरुद्धचे एकूण 7 वे कसोटी शतक ठरले आहे. याबरोबरच त्याने एका खास विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.

विराटने शतक पूर्ण करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 7000 धावांचा टप्पाही पार केला आहे. तसेच विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा पार करण्याचाही विश्वविक्रम केला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 105 सामन्यातील 133 डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 7021 धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

तेंडुलकरने 146 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 7000 धावांचा टप्पा पार केला होता.

विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडेमध्ये 37 डावात 1744 धावा, टी20 मध्ये 10 डावात 265 धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 86 डावात 5012 धावा विराटने केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना 7000 धावांचा टप्पा पार करणारा विराट जगातील 13 वा तर केवळ दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 7000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

त्याचबरोबर विराट कसोटी क्रिकेटमध्येही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा पार करणारे क्रिकेटपटू:

133 डाव – विराट कोहली

146 डाव – सचिन तेंडुलकर

148 डाव – मोहम्मद युसुफ

149 डाव  – जॅक कॅलिस

159 डाव  – ब्रायन लारा

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा शतकाचा धडाका सुरूच

किंग कोहली बनला असा भीमपराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज

कोहली आणि रहाणेच्या खेळीचे ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूंनी केले कौतुक