हॅरी केन वादळात लेस्टरसिटी उद्धवस्त, ६-१ने पराभव

गतवर्षीच्या इंग्लिश प्रीमियर लीगचा विजेता संघ लेस्टरसिटी आणि गतवर्षीच्या आणि यावर्षीही दुसऱ्या क्रमांकावर असणारा टोट्टेनहॅम हॉटस्परचा संघ यांच्यात काल सामना झाला त्यात लेस्टरसिटीचा १-६ असा पराभव झाला. स्पूर्सकडून खेळणारा इंग्लंडचा आक्रमकपटू हॅरी केन याने गोलचा पाऊस पाडत सामन्यात वयक्तिक ४ गोल नोंदवले. इंग्लिश प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमात २६ गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत केनने पहिल्या स्थानावर झेप घेतली. तर त्याला दक्षिण कोरियन खेळाडू सन हुन -मिनने २ गोल करत उत्तम साथ दिली आणि सामना आरामात खिशात घातला.

 
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २५ व्या मिनिटाला हॅरी केनने स्पूर्सचे खाते उघडले, त्यानंतर सोबतीचा आक्रमक खेळाडू सन यानेही गोल करत संघाची स्कोर लाइन २-० ने पुढे नेली.
सामन्याचा दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर लेस्टरसिटीच्या खेळाडूंनी आक्रमणे वाढवली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आणि त्यांचा गोल झाला. चिलवेलने ५९ व्या मिनिटाला हा गोल नोंदवत स्कोर लाइन १-२ अशी केली. त्या नंतर हॅरी केन आणि सन यांनी सामन्याची सूत्रे स्वतःकडे घेतली. डेल अल्लीयाच्या कडून मिळालेल्या पासचा फायदा उठवत केनने ६३व्या मिनिटाला स्वतःचा दुसरा आणि टीमचा तिसरा गोल नोंदवत स्कोर लाइन १-३ अशी केली. त्यानंतर लगेच सनने ७१व्या मिनिटाला गोल करत आघाडी १-४ वर नेली. या पिछाडी नंतर लेस्टरच्या आव्हानात हवा गेली आणि सामन्याच्या शेवटी ८८व्या आणि ९०+२ व्या मिनिटाला गोल करत केन ने आघाडी १-६ अशी केली आणि स्वतःचे ४ गोल झळकावले.

 
गतवर्षीची चॅम्पियन असणारी लेस्टरची टीम या वर्षी ११ व्या स्थानावर आहे आणि हा सामना जिंकून ८व्या स्थानावर पोहचवण्याचे स्वप्न भंगले. गोल स्कोररच्या यादीत केन २६ गोल सह पहिल्या स्थानावर पोहचला तर दुसऱ्या स्थानावर असणारा एव्हर्टनचा रोमेलू लुकाकू याचे २४ गोल आहेत.