La Liga: लिओनेल मेस्सीने पुन्हा रचला इतिहास

ला लीगाच्या विजेतेपदाची दावेदारी मजबूत करायची सुवर्णसंधी म्हणजे कालचा सामना. गुणतालीकेत पहिल्या आणि दूसऱ्या स्थानावर असलेल्या बार्सेलोना आणि ॲटलेटिको डी मॅड्रिडमध्ये हा सामना रंगणार होता. सामन्याच्या आधी दोन्ही संघांमध्ये केवळ ५ गुणांचा फरक होता.

ला लीगामधील पहिले २ सर्वाधिक गोल्स करणारे खेळाडू बार्सेलोनाचे तर सर्वात कमी ११ गोल्स गोलपोस्टमध्ये जाऊ देणारे ॲटलेटिको डी मॅड्रिड यांचा सामना म्हणजे लीगमधील सर्वोत्कृष्ट  अटॅक विरुद्ध सर्वोत्कृष्ट डिफेन्स असाच होता. त्यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा तशी रसिकता दाखवली आणि या मौसमातील सर्वाधिक ९०,३५६ प्रेक्षकांनी मैदानावर उपस्थिती नोंदवली.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये बार्सेलोनाने पूर्णपणे आपले वर्चस्व ठेवले. सामन्यात बार्सेलोनाने संधी निर्माण केल्या पण त्यांना यश मिळत नव्हते आणि ॲटलेटिकोला एक पण संधी निर्माण करण्यात यश मिळत नव्हते. २५ व्या मिनिटाला मेस्सीवर फाऊल झाला आणि बार्सेलोनाला फ्री कीक मिळाली. मागील दोन सामन्यात लगातार फ्री कीकवर गोल करणाऱ्या मेस्सीने तिसऱ्या सामन्यात सुद्धा २६ व्या मिनिटाला फ्री कीकवर गोल करत ला लीगामधील २४ वा फ्री कीक गोल केला तर कारकीर्दीतील ३९ वा फ्री कीक गोल होता. त्यातील ३३ गोल्स बार्सेलोना तर ६ अर्जेंटिना साठी केले आहेत.

दूसऱ्या हाफमध्ये ॲटलेटिको डी मॅड्रिडने आपला खेळ चांगला करत गोल्सची संधी तर निर्माण केली पण त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही आणि सामना १-० ने बार्सेलोनाच्या खिशात गेला.

या सामन्यातील गोल मेस्सीचा आपल्या कारकीर्दीतील ७४७ सामन्यातील ६०० वा गोल होता. त्यातील ५३९ बार्सेलोनासाठी तर ६१ गोल्स अर्जेंटिनासाठी केले आहेत.

मेस्सीच्या ६०० गोल्स बद्दल काही आकडेवारी:-
सर्वाधीक गोल्स संघांविरुद्ध;
१)सेविल्ला:- २९ गोल्स ३१ सामने
२)ॲटलेटिको:- २८ गोल्स ३६ सामने
३)रियल मॅड्रिड:- २५ गोल्स ३७ सामने

गोल्स कोणत्या अवयवाने:-
४९६:- डावा पाय
७८:- उजवा पाय
२४:- हेडर
०२:- इतर

गोल्सचे स्वरुप:-
पेनल्टी कीक:- ७७
फ्री कीक:- ३९
एका सामन्यात दोन गोल्स:- ११८
हॅट्रिक:-३८

विविध स्पर्धांमधील गोल्स:-
बार्सेलोना तर्फे:-
ला लीगा:- ३७३
चॅम्पियन्स लीग:- ९८
कोपा डेल रे:- ४७
सुपरकोपा:- १३
क्लब वर्ल्ड कप:- ५
युरोप सुपर कर:- ३

अर्जेंटिना तर्फे:-
फ्रेंडलि:- २७
वर्ल्ड कप क्वालिफायर:- २१
कोपा अमेरिका:- ८
वर्ल्ड कप:- ५