या दिग्गज क्रिकेटपटुंवर बनले आहेत चित्रपट

बॉलीवूड आणि क्रिकेट या दोनच अश्या गोष्टी आहेत ज्यांचा भारतीय जनतेवरवर लगेचच प्रभाव पडत असतो. क्रिकेटमध्ये कोणी नवीन खेळाडू चांगला खेळायला लागला की सगळे त्याला डोक्यावर घेतात तर बॉलिवूडमध्ये एक चित्रपट हिट झाला की लगेचच त्याला सुपरस्टार म्हणतात.

क्रिकेट आणि बॉलीवूड हे नेहमीच हातात हात घालून चालत हे आपण सर्वांनी पाहिले आहेच पण आता बॉलीवूडमध्ये एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे तो म्हणजे भारतीय क्रिकेटर्सवर चित्रपट बनवण्याचा. मग ते युवराज सिंग कपिल देव सारखे दिग्गज पुरुष क्रिकेटर्स असो वा मिताली राज झुलन गोस्वामी सारख्या महिला क्रिकेटर्स असो. या सर्व खेळाडूंवर आता चित्रपट बनवण्याचे बॉलीवूडने मनावर घेतले आहे.

या आधी ही बॉलीवूडमध्ये अनेक खेळाडूंवर चित्रपट बनवण्यात आले आहे. भाग मिल्खा भाग, मॅरी कॉम हे यातील काही चित्रपट. या आधी क्रिकेटर्सच्या आयुष्यवरही चित्रपट बनवण्यात आले आहे, पाहुयात कोणते आहेत ते चित्रपट:

१. अझर

भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीनच्या आयुष्यवर बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटात अझरची भूमिका इम्रान हाश्मीने निभावली होती. या चित्रपटात अझरच्या क्रिकेटमधील जीवनाबरोबरच त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही बरेच काही सांगण्यात आले होते.

महंमद अझरउद्दीन कसा क्रिकेटकडे वळला, मग तो कसा भारताचा स्टार फलंदाज झाला ते त्याच्यावर मॅच फ़िक्सिन्गचा आरोप कसा लागला आणि यातून तो कसा निर्दोष सुटला हा प्रवास चित्रपटातून उलगडतो.

महंमद अझरउद्दीनने भारतासाठी ९९ कसोटी तर ३३४ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत जवळजवळ ६२१५ धावा केल्या आहेत तर वनडेमध्ये ९३७८ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा त्याच्या नावावर आहेत. त्याने भारताचे कसोटी सामन्यांमध्ये ४७ वेळा नेतृत्व केले आहे ज्यात १४ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे तर १४ मध्ये हार आणि १९ सामने ड्रॉ राहिले आहेत.

२. एम. एस. धोनी: दि अनटोल्ड स्टोरी

२०१६मध्ये आणखीन एक क्रिकेटरवर चित्रपट बनवण्यात आला तो म्हणजे भारताचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर. या चित्रपट धोनीचा टिकिट कलेक्टर ते भारताचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार हा अविस्मरणी प्रवास दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले असून, सुशांतसिंग राजपूत याने धोनीची भूमिका हुबेहूब मोठ्या पडद्यावर साकारली आहे. या चित्रपटही धोनीच्या क्रिकेटपटू म्हणून जीवनाबरोबरच त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

धोनी क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यावर जसे विक्रम करतो तसेच त्याच्या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर विक्रम केला आहे. खेळावर आधारित चित्रपटामध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

३. सचिन अ बिलियन ड्रीम्स

क्रिकेटचा आराध्य दैवत मानला जाणारा सचिन रमेश तेंडुलकरच्या जीवनावर २०१७ मध्ये चित्रपट बनवण्यात आला. हा एका सामान्य बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे नसून एखाद्या डोकमेंटरी प्रमाणे होता.

सचिन तेंडुलकरचे बालपण कसे गेले ते त्याचे भारतीय संघाबरोबरचे सर्व चांगले वाईट अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आले. सचिननेच या चित्रपटाचे कथन केले आहे. हा चित्रपट हिंदी मराठी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषेत शूट करण्यात आला होता. या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिलेलं आहे. या चित्रपटाने जवळ जवळ ५० कोटीची कमाई केली आहे.

भविष्यात क्रिकेटपटूंच्या जीवनावर येणारे चित्रपट
१. युवराज सिंग
२. मिताली राज
३. झुलन गोस्वामी
४.कपिल देव