पुन्हा एकदा होणार वर्ल्ड ११ विरुद्ध विश्वविजेते असा सामना

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. हा सामना आंतरराष्ट्रीय असून तो वेस्ट इंडिजमधील एका मैदानाचे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे. या सामन्यातून उभा राहणारा निधी त्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे.

विंडीजचा संघ हा टी२०मधील सध्याचा विश्वविजेता संघ आहे.

डोमिनिका येथील विंड्सर पार्क स्टेडियम आणि ङ्गुल्ल येथील जेम्स रोनाल्ड वेब्स्टर पार्क या वेस्ट इंडिजमधल्या दोन स्टेडियमचे इर्मा आणि मारिया वादळामुळे नुकसान झाले होते. यामुळे क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आयपीएलचा मोसम २७ मे रोजी संपणार असून १४ जून रोजी भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यामुळे या संघात भारतीय खेळाडू भाग घेताना दिसू शकतात.

या सामन्यात वर्ल्ड ११ कडून दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान सारख्या दिग्गज संघांचे खेळाडू खेळताना दिसू शकतात. पाकिस्तान या काळात इंग्लंडमध्येच २ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यात दिसण्याची शक्यता कमी आहे. कारण १ जून पासून त्यांचा दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

यापूर्वी वर्ल्ड ११ पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका खेळले असून त्यात त्यांना १-२ असे पराभवाला सामोरे जावे लागले होते.