डेव्हिड वॉर्नरने मानले भारतीयांचे आभार

हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता मायदेशी परतले आहेत.

त्याबद्दलच ऑस्ट्रलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून भारताचे आभार मानले आहेत. त्याने त्याचा सेल्फी पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, “आमचे पुन्हा एकदा आदरातिथ्य केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला खरंच तुमच्या देशात यायला आणि क्रिकेट खेळायला आवडते. काल रात्रीबद्दल माफ करा. अशा आहे पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू.”

ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार स्टीव्हन स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेनंतर मायदेशी परतला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या टी २० मालिकेत वॉर्नरने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले होते. या मालिकेत दोन्हीही देशांनी एकेक सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.

या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघाला वनडे मालिकेत अपयश आले होते. त्यांनी वनडे मालिका ४-१ ने हरली होती. त्यांनी एकमेव चौथा वनडे सामना जिंकला होता जो वॉर्नरचा १०० वा वनडे सामना होता आणि त्याने शतकी खेळी उभारली होती. असे करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन तर जगातील ८ वा खेळाडू ठरला.

वॉर्नर हा आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०१६ मध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघ विजयी झाला होता.