मुंबईत सोमवारपासून महा मुंबई कबड्डी लीगला सुरुवात

कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कबड्डीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. कबड्डीमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर आता मुंबई शहरात महा मुंबई कबड्डी लीगचे सोमवार पासून आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १५-२१ जानेवारी २०१८ या काळात विशाल सह्याद्री क्रीडांगण, सह्याद्री नगर, चारकोप, कांदिवली पश्चिम येथे होत असून याचे आयोजक अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओएच मीडिया हाऊस याचे आयोजक आहे.

अंदाजे ७२ खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार असून त्यांना ५ हजार ते १० हजार देऊन संघात घेण्यात आले आहे. यात मुंबईचे ५४ तर महाराष्ट्राच्या अन्य भागातून १८ असे एकूण ७२ खेळाडू तब्बल १२०० खेळाडूंमधून निवडण्यात आले आहेत.

प्रत्येक संघ या स्पर्धेत मुंबई विभागातून ९ आणि अन्य महाराष्ट्रातून ३ असे एकूण १२ खेळाडू संघात घेऊ शकतो. स्पर्धेत एकूण ६ संघ भाग घेत आहेत.

या स्पर्धेकडे तमाम कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले असून तरुण खेळाडूंसाठी ही स्पर्धा एकप्रकारे मोठी संधी मानली जात आहे.