महा टेनिस फाउंडेशनतर्फे आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमीचे उद्घाटन

पुणे । टेनिसची लोकप्रियता वाढविण्याच्या आणि महाराष्ट्रातील इच्छुक आणि विद्यमान टेनिस प्रतिभेस उत्कृष्ट प्रशिक्षण प्रदान करण्याच्या हेतूने महा टेनिस फाउंडेशनतर्फे आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी(एपीएमटीए)चे उद्घाटन आज करण्यात आले.

एपीएमटीएच्या वतीने खेळाडूंच्या विकासाबरोबरच त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावरच भर देणार नसून स्पोर्ट्स सायन्सच्या सहकार्याने त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि जीवनशैली विकसित करण्यासाठी मदत करणार आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, संपूर्ण राज्यभर भागीदार केंद्राद्वारे टेनिस खेळाचा प्रसार व सहभाग वाढविण्यासाठी भर देण्यात येणार आहे. ‘ट्रेन-द-ट्रेनर’ कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दर्जा आणखी विकसित करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

एपीएमटीएचे अध्यक्ष आदर पुनावाला म्हणाले की, कोणत्याही देशातील युवा वर्गाला महत्वपूर्ण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी खेळ महत्वाचा आहे. भारतामध्ये अनेक गुणवान युवा खेळाडू असून कोणत्याही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तसेच जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे.

या अकादमीच्या माध्यमातून भारतात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून उचललेले हे एक पाऊल आहे. जागतिक स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी व सर्वसामान्य लोकांना यामध्ये सामावून घेण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिका-यांची आहे. युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे व देशासाठी नवे शिखर गतवे यासाठी एपीएमटीएने उचललेले एक पाऊल आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून आणि मुख्य सचिव प्रवीण परदेशी, श्री प्रवीण दराडे, श्री संजय खंदारे,आदर पुनावाला यांच्या सहकार्याने भारतातील यशस्वी खेळाडू घडविण्याच्या हेतूने हा प्रयत्न केला गेला आहे.

महा टेनिस फाउंडेशनचे चेअरमन असिमकुमार गुप्ता म्हणाले की, राज्यातील प्रतिभावान व उभरत्या खेळाडूला आगामी काळात भविष्यात जागतिक दर्जाचे प्रशिक्षण फायदा मिळणार असून खेळाडूंना आपली गुणवत्ता वाढवण्याकरिता यातून मदत मिळणार आहे.

एपीएमटीए मधील खेळाडूंच्या विकासासाठी अनुभवी प्रशिक्षकांची एक टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये माजी राष्ट्रीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे याचे तांत्रिक संचालक म्हणून टीमचे प्रतिनिधित्व करतील.याशिवाय मुख्य प्रशिक्षक केदार शहा, आदित्य मडकेकर, राधिका कानिटकर,फिजीकल कंडीशन एक्सपर्ट कैफी अफजल व स्ट्रेंथ ट्रेनर गौरव निजॉन यांचा समावेश असणार आहे.

महा टेनिस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सुतार म्हणाले की, गतवर्षी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या प्रारंभी आणि अनावरण झाल्यानंतर एपीएमटीए स्थापन करण्याची संकल्पना मांडली गेली होती. या संकल्पनेला पाठींबा दिल्याबद्दल आम्ही आदर पुनावाला ग्रुपचे आभारी असून महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या मदतीने महाराष्ट्रातील टेनिस वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड असेल आणि भविष्यात प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.

या अकादमीचे पहिले तीन केंद्र पुण्यात पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखान येथे तर एक नाशिक टेनिस सेंटर येथे सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय कोल्हापुर,सोलापुर व नागपुर मध्येही तीन केंद्र सुरु करण्याचा विचार आहे.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, यासारख्या ग्रामीण कार्यक्रमांअंतर्गत आलेले खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विजेत्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय यश मिळविण्यासाठी एमएसएलटीएशी संलग्न होऊन एपीएमटीए सहकार्य करेल, अशी आशा आहे.

2018 अशियायी क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती व भारतीतील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू अंकिता रैना, ऋतुजा भोसले, डेव्हिस कुपर व टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा वाइल्डकार्ड विजेता अर्जुन कढे, आर्यन गोविस, राष्ट्रीय खेळाडू सिध्दांत बांठीया हे या अकादमीचे पहिले प्रशिक्षणार्थी असणार आहेत.