राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची चार सुवर्णपदकांची कमाई

वडोदरा। महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्ट्स 64 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स2 टेबल टेनिस स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई करत आपली छाप पाडली. भारताची 44 वी मानांकित खेळाडू असलेल्या श्रेयाच्या नेतृत्वाखाली खेळताना महाराष्ट्राने मुलींच्या 19 वर्षाखालील एकेरी गटासोबत मुलींच्या 19 वर्षाखालील संघिक गटात देखील सुवर्णपदक मिळवले.

श्रेयाने आपल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या 43 व्या मानांकित तमिळनाडूच्या श्वेथा स्टेफीला 3-0 (11-8, 11-9,11-7) असे पराभूत करत जेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर सांघिक गटात पश्चिम बंगालच्या संघास 3-0 असे पराभूत करत जेतेपद मिळवले.

भारताच्या चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या तेजलने दिपनविता बासूला 3-1 (6-11, 11-8, 11-9, 11-8) असे नमविले.आदिती सिन्हाने जेसिका सरकारला 3-0 (11-5, 11-8, 11-4) असे पराभूत करत संघाची आघाडी बळकट केली.शेवटी श्रेयाने पौलमी नाथवर 3-2 (11-6, 7-11, 10-12, 11-6, 14-12) असा विजय मिळवत संघाला जेतेपद मिळवून दिले.

मुलांच्या 17 वर्षाखालील सांघिक गटात महाराष्ट्राने दिल्लीवर 3-1 असा विजय मिळवला. भारताच्या तिसऱ्या मानांकित दिपीत पाटीलने श्रेयांश गोयलला 3-1 (11-6, 11-8, 10-12, 11-7) असे पराभूत करत आघाडी घेतली.पण, दिल्लीच्या यशांश मलिकने भारताच्या सहाव्या मानांकित देव श्रॉफला 3-2 (11-7,6-11, 11-9,7-11,11-9) असे पराभूत करत सामना बरोबरीत आणला.

महाराष्ट्र संघाने यानंतर पुनरागमन करत ऋषीकेश माधवने अंश बजाजवर 3-1 (11-6, 7-11, 13-11, 11-4) अशा फरकाने विजय नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तर, दिपीत पाटीलने यशांश मलिकला 3-2 (11-5, 11-7, 9-11, 9-11, 11-5) असे पराभूत करत संघाला जेतेपद मिळवून दिले. मुलींच्या 14 वर्षाखालील गटातील सामन्यात महाराष्ट्रने दिल्लीला 3-2 असे पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.