राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण व रौप्यपदक

वडोदरा। इलेव्हन स्पोर्ट्स 64 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी चमक दाखवत एक सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.

भारताचा तिसरा मानांकित दिपीत पाटील याने मुलांच्या 17 वर्षाखालील सांघिक गटात संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात आपले योगदान दिले होते. त्याने एकेरीतही चमक दाखवत सुवर्णपदकाची कमाई केली.

स्थानिक खेळाडू चित्राक्स भट याच्याविरुद्ध खेळताना त्याने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. दिपीत पाटीलने पहिला गेम 11-3 असा जिंकत चांगली सुरुवात केली. दुस-या गेममध्ये त्याला 9-11 असे पराभूत व्हावे लागले. पण, दिपीतने पुढचे दोन्ही गेम 11-4, 11-5 असे जिंकत सामन्यात विजय मिळवला. त्यापुर्वी झालेल्या उपांत्यसामन्यात दिपीतने दिल्लीच्या श्रेयांश गोयलला 3-1 असे नमवित अंतिम फेरी गाठली होती.

मुलांच्या 14 वर्षाखालील गटातील सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला सी.बी.एस.ई कडून 0-3 असे पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या जश मोदीला सार्थ मिश्राकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले.तर, राजवीर सिंग व अमिश आठवले यांना अनुक्रमे आदर्श व शिवम चंद्रा यांकडून (1-3, 1-3) पराभवाचा सामना करावा लागला.