लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

महाराष्ट्राच्या विराज परदेशी, अजिंक्य बालवडकर, ऋतुजाला सुवर्णपदक

पुणे । महाराष्ट्र संघाने मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित पहिल्या लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत सात राज्यातील एकूण १६० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राष्ट्रीय शिबिरासाठी आणि लेझर रन जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

जागतिक स्पर्धा डब्लिन येथे २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन कॉन्फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी विठ्ठल शिरगावकर, विनय मराठे, जितेंद्र खासनिस, बाळासाहेब लांडगे, कमल गोस्वामी, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विराज परदेशीने वरिष्ठ गटात सुवर्णपदक मिळवले. यात ४ बाय ८०० मीटर धावणे आणि १० मीटर वरून शूटिंग याचा समावेश होता. विराजने ११ मिनिटे ४३.३३ सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने (११ मि. ४५.११ से.) रौप्यपदक, तर राकेश वेंडेने (११ मि. ५३.१५ से.) ब्राँझपदक मिळवले. ज्युनियर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अजिंक्य बालवडकरने (११ मि. २५.९४ से.) सुवर्णपदक पटकावले. त्याने मध्य प्रदेशच्या रवीसिंग पाल (११ मि. ३५.६६ से.,) आणि धरमेंद्रसिंग ठाकूर (११ मि. ३६.१६ से.) यांना मागे टाकले. रवी आणि धरमेंद्रला अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. वरिष्ठ महिला गटात बिहारच्या प्रतिमाकुमारी माहताला (१३ मि. ६.२० से.) सुवर्ण, आंध्र प्रदेशच्या स्वाती के. हिला (१६ मि. ४७.७८ से.) रौप्य आणि भारती ए. हिला (१७ मि. ३६.७८ से.) ब्राँझपदक मिळाले.

स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकरने सुवर्णयश मिळवले. तिने १४ मिनिटे ५५.१३ सेकंद अशी वेळ नोंदवली. आंध्र प्रदेशच्या रिशिता श्री पी. हिला (१८ मि. ५०.०९ से.) रौप्य आणि आरती प्रियाला एम. हिला (२२ मि. ५७.४१ से.) ब्राँझपदक मिळाले. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थ खराटेने (११ मि. ५४.६० से.) रौप्यपदकाची कमाई केली. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्यन पाटीलने (७ मि. २२.७० से.) रौप्य, तर लहुकुमार वाघुंडेने (७ मि. ३१.६७ से.) ब्राँझपदक मिळवले. या गटात ४ बाय ४०० मीटर धावणे आणि १० मीटर शूटिंगचा समावेश होता. मुलींच्या गटात पहिले तीन क्रमांक महाराष्ट्राच्या मुलींनी पटकावले. यात इफिया इक्कलवाले (८ मि. ८.६२ से.), मैत्राली भंडारी (८ मि. २०.७७ से.) आणि प्रिया चौगुले (८ मि. ३४.५९ से.) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझपदक मिळवले.

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या गटात ४ बाय ४०० मीटर धावणे आणि ७ मीटरवरून शूटिंग करणे असे प्रकार होता. यात महाराष्ट्राच्या अनन्या नामडेने (७ मि. ५३.१३ से.) सुवर्ण, मुग्धा वाव्हळने (७ मि. ५३.५२ से.) रौप्य आणि मनाली रतनोजीने (७ मि. ५४.४५ से.) ब्राँझपदक मिळवले. स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मुलांनी वर्चस्व राखले. अर्जुन आडकरने (५ मि. ००.४० से.) सुवर्ण, शुभम देशपांडेने (५ मि. २९.८७ से.) रौप्यपदक, तर अजिंक्य कुत्तरमारे (५ मि. ४५.४५ से.) याने ब्राँझपदक मिळवले. मुलींच्या गटात नंदिनी मेणकरने सुवर्ण, तर वैभवी भोईटेने रौप्यपदक मिळवले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

विश्वचषकाच्या फायनलची खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला