तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या वीरांचा गौरव

पुणे । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात आले.

तसेच गोरगन, इराण येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

हा दिमाखदार सोहळा पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये संध्याकाळच्या सत्रात पार पडला.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव आस्वाद पाटील, उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे, कार्यधयक्ष दत्त पाथ्रीकर, खजिनदार शांताराम जाधव आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर उपस्थित होत्या.

यावेळी रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे(सांगली), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई(पुणे), अजिंक्य कापरे(मुंबई शहर), रवी ढगे (जालना), प्रशिक्षक माणिक राठोड आणि व्यवस्थापक फिरोझ पठाण यांना गौरविण्यात आले.

विशेष पारितोषिक हे गोरगन, इराण येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांना देण्यात आले.

पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनकडून खेळाडूंना ब्लेझर देण्यात आले तर सतेज कबड्डी ग्रुपकडून खेळाडूंना घड्याळ भेट देण्यात आली.