राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव

पुणे । तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्र राज्याला ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा २७ जानेवारी रोजी गौरव केला जाणार आहे. हा गौरव समारंभ श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

यावेळी हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून भाग घेतलेल्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना प्रत्येकी ५१ हजार रुपये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनकडून देण्यात येतील तर पुणे कबड्डी असोशिएशनकडून खेळाडूंना खास ब्लेझर देण्यात येणार आहे.

महा स्पोर्ट्सशी बोलताना राज्य संघटनेचे उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, ” तब्बल ११ वर्षांनी खेळाडूंनी एवढी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान संघटनेने करायचे ठरवले आहे. यावेळी खेळाडूंचा गौरव महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते केला जाणार असून मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आणि खासदार गजानन कीर्तिकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही असतील. “

भारताला गोरगन इराण येथे महिलांच्या कबड्डी गटात एशियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांचाही सत्कार होणार आहे.

हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे(सांगली), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई(पुणे), अजिंक्य कापरे(मुंबई शहर) आणि रवी ढगे (जालना) या खेळाडूंनी भाग घेतला होता.

हा संपूर्ण कार्यक्रम २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.