“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!

गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राचा महिलांचा संघ फक्त एकदा अंतिम सामना खेळला आहे ज्यात तो पराभूत झाला,पुरुषांचा संघ तर तेव्हढीही मजल मारू शकलेला नाही, मागील वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उपांत्य सामना खेळणे ही पुरुषांची ५ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे!

याची कारणे अनेक सांगता येतील.यशस्वी संघांकडे बघितले तर असे लक्षात येते की त्यांचे कर्णधार हे संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असतात आणि विशेष म्हणजे कर्णधारपदात सातत्याने बदल केले जात नाहीत! उदा.हरयाणा पुरुष संघाचे कर्णधारपद गेल्या २ वर्षांपासून अनुप कुमारकडे आहे,भारतीय रेल्वे महिला संघाचे कर्णधारपद गेल्या ५ वर्षांपासून तेजस्विनी बाईकडे आहे.

आपल्याकडे मात्र याचा अभाव आहे. उलट या वर्षीचा कर्णधार पुढल्या वर्षी संघातच नसतो अशीच परिस्थिती बघायला मिळते.अभिलाषा म्हात्रे सारखी आंतरराष्ट्रीय कीर्तीची कबड्डीपटू संघात असूनही कर्णधारपद दुसऱ्या व्यक्तीकडे जावे यातच सगळं आलं! पुरुष संघात अशा अनुभवी व्यक्तीची उणीव आहे ही गोष्ट अलाहिदा!

महाराष्ट्रात गुणवान खेळाडूंची कमतरता अजिबात नाही मात्र त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो,सुविधा मिळतात का हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याच वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर मोजून एक आठवडाभर कराड येथे संघाचे शिबीर चालले.एव्हढ्या कमी वेळात जिल्हा स्पर्धांत झालेले मानापमान विसरून जायचे, सराव करायचा, कोण कुठे खेळणार हे ठरवायचे, चढाईचे क्रम ठरवायचे, संघ समतोल साधायचा आणि मुख्य म्हणजे विपक्षी संघांचा अभ्यास करून व्यूहरचना आखायच्यात आणि असे कितीतरी बारकावे अभ्यासण्याचे काम होत असेल असे मला तरी नाही वाटत. मग अशा परिस्थितीत खेळाडुंकडून जेतेपदाची अपेक्षा ठेवणे साफ चुकीचे वाटते!

असे असतानाही आपले खेळाडू आपले सर्वस्व देऊन खेळतात आणि महाराष्ट्राला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात! महिलांचा संघ तर अगदी जिंकता जिंकता राहतो असे म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही! त्यांच्या या प्रयत्नांना यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तरी यश लाभो हीच सदिच्छा!!

-शारंग ढोमसे