बीच कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी

१०वी पुरुष व महिला बीच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०१८

आंध्र प्रदेश राज्य कबड्डी असो. ने भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ” १०व्या पुरुष व महिला बीच राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी विजयी सलामी दिली.
क गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने अत्यंत चुरशीच्या लढतीत केरळचा कडवा प्रतिकार ४५-३९ असा रोखला. मध्यांतराला २१-२४ अशा ३ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने नंतर मात्र जोरदार मुसंडी मारली.
ओमकार जाधव, दादासो आवाड याने धारदार चढाया करीत संघाला भराभर गुण मिळवून दिले, तर प्रमोद घुले, आशिष मोहिते यांनी भक्कम बचाव करीत पकडीत गुण घेत संघाला ६गुणांनी विजय मिळवून दिला. महाराष्ट्राचे दोन्ही संघ क गटात असून पुरुषांचा मार्ग खडतर आहे.
 
पुरुषांच्या क गटात महाराष्ट्रासह सेनादल, केरळा व कर्नाटक असे चार संघ आहेत. महिलांच्या क गटात महाराष्ट्रासह पंजाब, तेलंगणा हे आणखी दोन संघ आहेत. या स्पर्धेत पुरुष विभागात २३, तर महिला विभागात २० संघांनी सहभाग घेतला आहे.